दक्षिण महाराष्ट्रातील ३५ साखर कारखान्यांवर कारवाईचे आदेश

कारखाना
कारखाना

कोल्हापूर : उसाच्या एफआरपीची रक्कम १४ दिवसांत दिली नसल्याने दक्षिण महाराष्ट्रातील सुमारे पस्तीस साखर कारखान्यांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. साखर, मोलॅसिस (मळी), बगॅस आणि जंगम मालमत्ता जप्त आदी कारवाई करण्याबाबतचे हे आदेश आहेत.  कोल्हापुरातील चौदा कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जप्ती आदेशामध्ये दत्त (शिरोळ), संताजी घोरपडे (बेलेवाडी), वारणा (वारणानगर), पंचगंगा (इचलकरंजी), गुरुदत्त शुगर्स (टाकळवाडी), इको केन (म्हाळुंगे) व जवाहर (हुपरी) या कारखान्यांचा समावेश आहे. ज्या-त्या तालुक्‍यातील तहसीलदारांकडून जप्तीची कारवाई केली जाणार आहे.  कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ३५ साखर कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश आहेत. यामध्ये २३ कारखान्यांना कारणे दाखवा तर १२ कारखान्यांवर साखर, मोलॅसिस (मळी), बगॅस आणि आवश्‍यकतेप्रमाणे कारखान्याची जंगम व स्थावर मालमत्ता जप्त करून आणि त्याची विक्री करून उसाची एफआरपी देण्याचे आदेश साखर आयुक्त गायकवाड यांनी दिले. दरम्यान, चौदा दिवसांनंतर १५ टक्के व्याजही द्यावे, अशा सूचनाही आहेत.  आजरा, अप्पासाहेब नलवडे (गडहिंग्लज), भोगावती (परिते), छत्रपती राजाराम (कसबा बावडा), छत्रपती शाहू (कागल), डॉ. डी. वाय. पाटील (वेसरफ तर्फे पळसंबे), दालमिया भारत शुगर (आसुर्ले-पोर्ले), दूधगंगा-वेदगंगा (बिद्री), अथणी शुगर (तांबाळे), कुंभी-कासारी (कुडित्रे), रियाबल शुगर महाडिक (फराळे), ओलम शुगर (हेमरस, राजगोळी खुर्द), सदाशिवराव मंडलिक (हमिदवाडा) व उदयसिंह गायकवाड (सोनवडे-बांबवडे) या कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.   दरम्यान, सांगली जिल्ह्यातील विश्‍वासराव नाईक (शिराळा), केन ॲग्रो (रायगाव), निनाईदेवी-दालमिया (कोकरूड), श्री महांकाली (कवठेमहांकाळ), दत्त इंडिया (सांगली) या कारखान्यांवर जप्ती आदेश दिले आहेत. उदगिरी शुगर (बामणी), सोनहिरा (वांगी), सदगुरू शुगर्स (राजेवाडी), राजारामबापू पाटील युनिट २ (वाटेगाव सुरूल), सर्वोदय (कारंदवाडी), राजारामबापू पाटील युनिट १ (राजारामनगर, साखराळे), मोहनराव शिंदे (आरग), क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड (कुंडल) व क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी (वाळवा) या कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com