कापूस उत्पादकतावाढीसाठी ‘सीआयसीआर’चा ॲक्‍शन प्लॅन 

जगाच्या तुलनेत भारताची आणि त्यातही महाराष्ट्राची प्रति हेक्‍टरी कापूस उत्पादकता कमी आहे. कापूस शेतीला अवघे पाच टक्‍के सिंचन आणि सघन लागवडीचा अभाव ही कारणे त्यामागे दिली जातात.
cotton
cotton

नागपूर ः जगाच्या तुलनेत भारताची आणि त्यातही महाराष्ट्राची प्रति हेक्‍टरी कापूस उत्पादकता कमी आहे. कापूस शेतीला अवघे पाच टक्‍के सिंचन आणि सघन लागवडीचा अभाव ही कारणे त्यामागे दिली जातात. याची दखल घेत केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने (सीआयसीआर) महाराष्ट्राची कापूस उत्पादकता वाढावी याकरिता पहिल्या टप्प्यात सघन लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भाने व्यापक जागृती केली जाणार असल्याचे ‘सीआयसीआर’च्या सूत्रांनी सांगितले. 

देशात सुमारे १२६.५८ लाख हेक्‍टर क्षेत्रावर कापसाची लागवड होते. त्यातील सर्वाधिक ४२ लाख हेक्‍टर लागवड महाराष्ट्रात, तर यातील विदर्भाचा वाटा १६ लाख हेक्‍टरचा आहे. परंतु देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत कापसाला गरजेच्या वेळी पाणी देण्याची सोय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे नाही. राज्याची कापूस शेतीची सिंचन क्षमता अवघी पाच टक्‍के आहे. परिणामी, कोरडवाहू शेतीमधून कापसाचे अपेक्षित उत्पादन मिळत नसल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कापूस शेती आतबट्ट्याची ठरत आहे. २०१९-२० या वर्षातील हंगामात तर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन खर्चाची भरपाईदेखील झाली नाही. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने अमेरिका, चीनच्या धर्तीवर महाराष्ट्रात सघन कापूस लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. 

येत्या हंगामात त्या संदर्भाने जागृतीवर भर दिला जाणार आहे. ९० बाय १५ सेंटिमीटर या अंतरावर लागवड केल्यास एकरी सरासरी २७ ते २८ हजार (६० ते ७० हजार हेक्‍टर) झाडे बसतील. सध्याच्या लागवड अंतरानुसार एकरी केवळ चार हजार झाडे राहतात. झाडांची संख्या दुप्पट झाल्याने उत्पादनातही वाढ होणार आहे. त्याकरिता केंद्रीय कापूस संशोधन संस्था आणि खासगी कंपन्यांनी देखील सघन लागवडीला पूरक वाण देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.  अशी आहे कापूस सिंचन क्षमता  महाराष्ट्र ः पाच टक्‍के  पंजाब, राजस्थान, हरियाना ः ९५ टक्‍के  गुजरात ः ५५ टक्‍के,  आंध्र प्रदेश, तेलंगणा ः ४९  अशी आहे उत्पादकता (रई किलो/हेक्‍टर)  ७५९  जागतिक  ९२५  अमेरिका  १८४२  चीन  १९७९  ऑस्ट्रेलिया  १८०४  टर्की  १५२४  मेक्सिको  ५०६  भारत  देशातील उत्पादकता (रई किलो/हेक्‍टर)  महाराष्ट्र ः ३१९  आंध्र प्रदेश ः ५८०  पंजाब ः ५६४  हरियाना ः ५३३  राजस्थान ः ६५९  गुजरात ः ६१४  मध्य प्रदेश ः ६५७  तेलंगणा ः ५१२  तमिळनाडू ः ७९६  कर्नाटक ः ५५६  प्रतिक्रिया जगाच्या तुलनेत भारताची उत्पादकता अत्यल्प आहे. त्यामुळे सघन लागवडीचे प्रयोग स्वागतार्ह असले, तरी महाराष्ट्रात कापूस शेतीसाठी अवघे पाच टक्‍के सिंचन ही बाब देखील उत्पादकतेवर परिणाम करणारी आहे. यापूर्वी महाराष्ट्रात सघन लागवडीचे प्रयोग झाले. परंतु अपेक्षीत जाणीवजागृती अभावी त्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. याची उपयोगिता पटावी याकरिता संशोधक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे.  - गोविंद वैराळे, ज्येष्ठ कापूस अभ्यासक 

महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र अधिक असले तरी उत्पादन मात्र अत्यल्प आहे. त्यामुळेच संस्थेने महाराष्ट्रात व मुख्यत्वे विदर्भात सघन लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भाने शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जाईल. एकरी लागवड अंतर कमी करून झाडांची संख्या वाढविणे यात अपेक्षित आहे.  -डॉ. वाय. जी. प्रसाद, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com