खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी ः देसाई

जादा दराने रासायनिक खतांची विक्री होत असल्यास संबंधित कृषी सेवा केंद्रावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कृषी यंत्रणांना दिले. खरीप हंगामाबाबत दूरदृश्यप्रणालीद्वारे त्यांनी आढावा घेतला.
Action should be taken against those who sell fertilizers at extra rates: Desai
Action should be taken against those who sell fertilizers at extra rates: Desai

वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद वगळता सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या आहेत. पेरण्या पूर्ण झाल्यानंतर रासायनिक खतांची मागणी वाढेल. रासायनिक खतांची विक्री शासनाने ठरवून दरानेच होणे आवश्यक आहे. जादा दराने रासायनिक खतांची विक्री होत असल्यास संबंधित कृषी सेवा केंद्रावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कृषी यंत्रणांना दिले. खरीप हंगामाबाबत दूरदृश्यप्रणालीद्वारे त्यांनी आढावा घेतला.

आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, कृषी विकास अधिकारी विकास बंडगर या सभेला उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, की शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये पुरेशा प्रमाणात व वेळेवर बियाणे, खते उपलब्ध करून देण्याची सूचना वेळोवेळी केलेली आहे. आगामी काळात रासायनिक खतांची मागणी वाढणार असल्याने खतांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावा. बियाणे, खते मिळाले नाहीत, अशी कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही, याची दक्षता घ्यावी. रासायनिक खतांची जादा दराने विक्री होऊ नये, यासाठी तालुकास्तरीय भरारी पथकांना नियमितपणे कृषी सेवा केंद्रांची तपासणी करावी. तसेच बियाणे, खतांच्या अनुषंगाने कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास त्याअनुषंगाने तातडीने कार्यवाही करावी.

जिल्ह्यातील सुमारे १२ महसूल मंडळांमध्ये एकाच दिवशी ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्या मंडळांमधील नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल शासनाला सादर करावा. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी रस्ते, पूल वाहून जाण्याचे, पुलावरून पाणी वाहिल्याने वाहतूक ठप्प झाल्याचे प्रकार घडल्याचे दिसून आले आहे. नुकसानग्रस्त झालेले रस्ते, पूल यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असेही सुचविले.

श्री. तोटावार यांनी सांगितले, की जिल्ह्यासाठी ५३ हजार ६३ क्विंटल बियाणे मंजूर होते, त्याच्या १०५ टक्के म्हणजेच ५६ हजार १९९ क्विंटल बियाणे प्राप्त झाले आहे. तसेच खरिपासाठी ६१,८०० टन रासायनिक खतांची आवश्यकता असून, आतापर्यंत ५९ हजार ५२ टन रासायनिक खते उपलब्ध झाली आहेत. तसेच शासनाच्या निर्देशानुसार १४ जून अखेर जिल्ह्यात ७१८ टन युरिया बफर स्टॉकमध्ये ठेवण्यात आला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com