समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर कारवाईः मुख्यमंत्री 

कृपा करून शिस्त पाळा, सहकार्य करा असे मी जेंव्हा हात जोडून म्हणतो ते माझ्या महाराष्ट्रातील तमाम बंधू, माता- भगिनींसाठी असते जे अतिशय संयमाने, जिद्दीने आणि आत्मविश्वासाने या कोरोना विषाणूविरुद्ध लढत आहेत.
uddhav thakaray
uddhav thakaray

मुंबई: कृपा करून शिस्त पाळा, सहकार्य करा असे मी जेंव्हा हात जोडून म्हणतो ते माझ्या महाराष्ट्रातील तमाम बंधू, माता- भगिनींसाठी असते जे अतिशय संयमाने, जिद्दीने आणि आत्मविश्वासाने या कोरोना विषाणूविरुद्ध लढत आहेत. पण समाजात आणखी एक समाजविघातक विषाणू पसरत आहे, सध्याच्या परिस्थितीचा दुरुपयोग करून जर कुणी महाराष्ट्राला अडचणीत आणत असेल तर अशा समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.  ‘‘राज्यात पाडवा, रामनवमी, पंढरपूरची यात्रा यासारखे सर्व मोठे सण अगदी घरगुती स्वरूपात आयोजित झाले, कोणतेही मोठे उत्सव वा कार्यक्रम झाले नाहीत. ज्याप्रमाणे हे कार्यक्रम झाले त्याचप्रमाणे इतर धर्मियांनी सुद्धा आपले सण, समारंभ आणि कार्यक्रम करावेत, एकत्र येणे, गर्दी करणे टाळावे कारण राज्यात कोणत्याही धर्माच्या, राजकीय पक्षाच्या आणि कोणत्याही कारणासाठी कोणत्याही कार्यक्रमांना, खेळाच्या स्पर्धांना परवानगी दिली जाणार नाही म्हणजे नाहीच, तशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे असे कार्यक्रम आयोजित केलेच जाऊ नयेत,’’ असे कडक शब्दात स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, या विषाणूशी सगळे एकजुटीने लढत आहेत. याला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये, ते सहन केले जाणार नाही. 

हा विषाणू कोणताही जातिधर्म पाहत नाही. याची बाधा सगळ्यांना सारखीच होते. त्यामुळे इलाज म्हणून नाइलाजाने का होईना घरी बसा, गर्दी टाळा. संयम, जिद्द आणि आत्मविश्वासारखे दुसरे आयुध नाही, या आयुधाच्या मदतीने आपण हे युद्ध नक्की जिंकू असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी समाजविघातक कृत्ये करणाऱ्या प्रवृत्तींना आपल्या बोलण्यातून स्पष्ट इशारा आणि कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. 

राज्यात कोरोना बाधितांच्या केसेस वाढताहेत, मला ही माहिती लपवायची नाही हे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, की आपण महाराष्ट्रात आणि मुंबईत चाचणीची केंद्रे वाढवली आहेत. आपल्याकडे येऊन तपासणी करून घेणाऱ्यांपेक्षा आपण स्वत:हून पुढे जाऊन संशयितांचा शोध घेत आहोत. आज या रुग्णांची संख्या ५०० च्या वर गेली आहे पण ५१ रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी सुखरूप गेले आहेत याचाही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून उल्लेख केला.  आपल्याला आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांना विषाणूचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. यासाठी आपण सुरक्षित राहणे, गर्दीत, घराबाहेर न जाणे हा एक उपाय आहे. जीवनावश्यक वस्तुंची २४ तास उपलब्धता असताना गर्दी का करता, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी जनतेस विचारला तसेच संयमाची, जिद्दीची आणि आत्मविश्वासाची भिंत मनात अशीच मजबूत ठेवा, कोरोना तुमचे काहीही बिघडवू शकणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.  पाच लाख जणांची सोय इतर राज्यातील तसेच महाराष्ट्रातील स्थलांतरित कामगार-मजुरांची महाराष्ट्र शासनाने जबाबदारी घेतली असून जवळपास ५ लाख लोकांची सोय केली आहे. त्यांच्या दोन वेळेसचे जेवण, नाश्ता, राहण्याची आणि औषधोपचाराची मोफत सोय केली आहे. त्यामुळे कुणी कुठेही जायची गरज नाही, हे ही मुख्यमंत्री म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com