नक्षलग्रस्त भागात पोचली ‘आदर्श गाव’ चळवळ

ग्रामसभेत मार्गदर्शन करताना पोपटराव पवार
ग्रामसभेत मार्गदर्शन करताना पोपटराव पवार

पुणे : राज्याची आदर्शगाव चळवळ थेट नक्षलग्रस्त भागात पोचविण्याचा स्त्युत्य उपक्रम पोपटराव पवार सध्या करीत आहेत. नक्षलग्रस्त भागात जाऊन पोपटरावांनी चार तासांची ग्रामसभा घेतल्याने पोलिस खात्यालाही आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे पोपटराव पवार या संवदेशनशील गावात पोचताच आदिवासी शेतकऱ्यांनी दिवाळीसारखा जल्लोष केला.  

राज्य शासनाने आदर्श गाव योजनेसाठी ‘आदर्शगाव संकल्प व प्रकल्प’ स्थापन केला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यानंतर आता या प्रकल्पाचे कार्याध्यक्षपद पोपटराव पवार यांच्याकडे आहे. राज्यातील ११७ गावांना आदर्श करण्यासाठी पोपटरावांचे दिवसरात्र दौरे, बैठका सुरू आहेत. आता गोंदियातील पाच गावे आदर्श करण्याचा त्यांचा संकल्प आहे. गोंदियाच्या देवरी भागातील जेठबावडा भागात ग्रामसभा घेण्याचा निर्णय पोपटराव पवार यांनी काही दिवसांपूर्वी घेतल्यानंतर स्थानिक लोकांनी वेगळाच सल्ला दिला. नक्षलवादी कारवायांमुळे ग्रामसभांना तुम्ही स्वतः जाऊ नये, अशी विनंती श्री. पवार यांना करण्यात आली.

जनतेच्या हितासाठीच आदर्शगावाची संकल्पना आहे. खरे तर इतर जिल्ह्यांपेक्षाही आदिवासी भागाला या संकल्पनेची जास्त गरज आहे. त्यामुळे मी तेथे जाणार आणि लोकांशी संवाद साधणार, असा निर्धार करून पोपटराव पवार जेठबावडा भागात गेले. रामपाला, भुसारीटोला, सावरी, चिरचाळमाळ भागाचाही त्यांनी दौरा केला.  

यावेळी कृषी उपसंचालक महादेव निंबाळकर उपस्थित होते. आदिवासींना एकत्र करून इंग्रज सरकारविरुद्ध आंदोलने करणारे जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पोपटराव पवार यांनी जेठबावडा गावात प्रवेश केला. विशेष म्हणजे चार तासांची ग्रामसभा घेत गावाच्या विकासासाठी सखोल चर्चा केली. तुमच्या गावाला खरेच आदर्श व्हायचे आहे का, त्यासाठी तुम्ही कोणत्या संस्थेची मदत घेणार आहात, ग्रामकार्यकर्ता कोण असेल, गावकरी म्हणून तुम्ही स्वतः काय योगदान देणार आहात, असे प्रश्न पोपटराव पवार यांनी आदिवासींना विचारले.

श्री. पवार यांनी संवेदनशील भागाचा दौरा केल्यामुळे पोलिसांनाही आश्चर्य व्यक्त केले. ‘पोलिस बंदोबस्ताशिवाय या भागात जाणे धोक्याचे होते, असे मत पोलिसांनी व्यक्त केले. याबाबत पोपटराव पवार म्हणाले, की या भागात मला न जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र या भागात विकासाच्या योजना घेऊन जाणे हे आपलेच कर्तव्य आहे. मी त्याच भावनेतून या भागाचा दौरा केला.

`आदर्श गाव संकल्पनेमुळेच देवराम होळी आमदार` पोपटराव पवार यांच्या मते आदर्श गावाची चळवळ गडचिरोली भागात चांगली रुजत असून, लोकांनाही ते आवडते आहे. या चळवळीमुळे देवराम होळी यांना लोकांनी आमदार केले. गडचिरोलीतील दोन तर चंद्रपूर जिल्ह्यातील पाच गावे आदर्श झाली आहेत. ही चळवळ आम्ही थांबवणार नाही, असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com