पुणे बाजारसमितीने कांदा, टोमॅटो, डाळिंबाचा ई-नाममध्ये समावेश करावा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः आॅनलाइन राष्‍ट्रीय कृषी बाजार योजनेअंतर्गत (ई-नाम) कांदा, टोमॅटो, डाळिंबाचे आॅनलाइन लिलाव तातडीने सुरू करण्याचे आदेश पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी पुणे बाजार समितीला दिले आहेत. गुळाच्या आॅनलाइन लिलावाला अडत्यांनी विरोध केल्याने अडत्यांच्या परवाने निलंबनाची प्रक्रिया बाजार समिती प्रशासनाने सुरू केली आहे. यानंतर आता कांदा, टोमॅटो, डाळिंबाचे अडतदार कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. 

पुणे, मुंबई, नागपूर या बाजार समित्यांमध्ये ९० टक्के व्यापारी शेतमालाची आवक होत असल्याचे कारण देत, बाजार समित्यांनी ई - नामच्या अंमलबजावणीसाठी नकारात्मक भूमिका घेतली आहे. पणन संचालकांनी नुकतीच ई - नाम मध्ये सहभागी झालेल्या बाजार समित्यांची आढावा बैठक घेतली होती. यानंतर पुणे बाजार समितीमध्ये कांदा, टोमॅटो आणि डाळिंब हा १०० टक्के शेतीमाल हा शेतकऱ्यांचा असल्याने या शेतीमालाचा लिलाव ई - नाम अंतर्गत करण्याचे आदेश प्रशासक बी. जे. देशमुख यांना दिले आहेत.

पुणे बाजार समितीमध्ये डाळिंब आणि कांद्यासाठी स्वतंत्र यार्ड असल्याने या ठिकाणी आॅनलाइन लिलाव करणे तुलनेने सोपे आणि शक्य होणारे आहे. या यार्डांमध्ये डाळिंब आणि कांद्याचे स्वतंत्र लॉट पाडले जात असल्याने हे लिलाव आॅनलाइन करण्यात यावेत. तसेच टोमॅटोची आवकदेखील क्रेटमध्ये होत असल्याने याचे देखील लिलाव आॅनलाइन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  दरम्यान, पणन संचालकांच्या आदेशाची अंंमलबजावणी बाजार समिती प्रशासन गांभीर्याने करणार की, पुन्हा एकदा अडते शेतकऱ्यांची ढाल पुढे करून आदेशाला हरताळ फासणार हे लवकरच समजणार आहे.   इंदापूर, नारायणगावला आॅनलाइन लिलाव शक्य पुण्यासह इंदापूर आणि नारायणगाव (जुन्नर) बाजार समितीमध्ये अनुक्रमे डाळिंब आणि टोमॅटोची स्वतंत्र बाजारपेठ आहे. यामुळे या ठिकाणी ई-नामची प्रभावी अंमलबजावणी करणे शक्य आहे. मात्र, बाजार समित्या आणि अडत्यांचे संगनमत आणि नकारात्मक मानसिकता पारदर्शी व्यवहाराला अडथळा ठरत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com