पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय मंडळाच्या हालचाली

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार समितीवरील ‘प्रशासक राजवट’ संपुष्टात आणून पुन्हा प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्याच्या हालचाली भाजपच्या गोटात सुरू आहेत. आपली वर्णी मंडळावर लागण्यासाठी मुळशी हवेली तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत. तर नव्याने स्थापन होणाऱ्या मंडळावर मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळविण्यासाठीची धडपड सुरू केली आहे.   

ग्रामीण राजकारणातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या बाजार समित्या स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजप सरकारने प्रशासकीय मंडळाची खेळी यापूर्वी केली होती. यासाठी मुळशीचे ज्येष्ठ नेते एकनाथ टिळे यांच्या अध्यक्षतेखालील मंडळाची नियुक्ती केली. यानंतर टिळे यांना हे पद न झेपल्याने बारामतीच्या तरुण कार्यकर्ते दिलीप खैरे यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली. सुमारे तीन वर्षांच्या कालावधीमध्ये प्रशासकीय मंडळाला कामाचा सूर गवसला नाही. तसेच, मंडळातील अनेक असंतुष्ट सदस्य एकमेकांकडे संशयाने पाहू लागल्याने त्यांच्यामध्ये एकी नव्हती. काही दिवसांनी सरकारमधील मित्रपक्ष असलेले शिवसेनेने पुरंदरचे शिवसेना नेते दादा घाटे आणि बाजार समितीमधील आल्याचे प्रसिद्ध व्यापारी अनिल देवडे यांनी स्वतःचे वजन वापरून मंडळावर आपली वर्णी लावून घेतली, मात्र त्यांनी हे पद केवळ शोभेसाठी वापरले.

या दरम्यान शासनाने प्रशासकीय मंडळाला कामाचा सुर गवसत नसल्याचे पाहून, हिच संधी माजी सचिव, प्रशासक आणि विद्यमान प्रशासक बी. जे. देशमुख यांनी हेरली आणि पालकमंत्र्यांसह विविध लोकप्रतिनिधींची शिफारस पत्रे मिळवत सचिवपदी वर्णी लावून घेतली. यासाठी प्रशासकीय मंडळाकडून स्वतःच्या शिफारसीसाठी ठरावदेखील करून घेतला. यानंतर देशमुख यांनी कायद्याच्या ज्ञानाचा खुबीने वापर करत, बाजार समिती विभाजनाची प्रक्रिया राबवित हवेली कृषी बाजार समिती, असे विभाजन करण्यास सरकारला भाग पाडले. यासाठी शिरूर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी त्यांना साथ दिली. 

पुणे जिल्हा बाजार समितीचे हवेली बाजार समितीमध्ये विभाजन झाल्यानंतर प्रशासकीय मंडळाची राजवट संपुष्टात आली आणि बी. जे. देशमुख यांनी प्रशासक म्हणून रुजू झाले. प्रशासकांच्या सुमारे दीड वर्षांच्या कालवधीनंतर आता पुन्हा हवेली बाजार समितीवर प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीच्या हालचाली सरकारकडून सुरू केल्या आहेत. 

बाजार समितीचे विभाजन करताना, हवेली आणि मुळशी तालुक्यांतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीच्या अपेक्षा होत्या, त्या आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पूर्ण होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत पदाधिकाऱ्यांना ''बळ'' देण्यासाठी लवकरच प्रशासकीय मंडळ स्थापन होण्याची शक्यता पणन आणि सहकार विभागातन वर्तविण्यात आली आहे.   

ही  नावे चर्चेत  मागील प्रशासकीय मंडळातील उपाध्यक्ष भषण तुपे, गोरख दगडे, यांच्यासह रोहिदास उंद्रे, राजाभाऊ दाभाडे, सुनील कांचन, चित्तरंजन गायकवाड यांची नावे चर्चेत आहेत.   पायावर कुऱ्हाड मारून घेतली प्रशासकीय मंडळ असताना पी. ए. खंडागळे सचिव म्हणून कार्यरत होते. यानंतर बी. जे. देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. देशमुख यांच्या नियुक्तीसाठी प्रशासकीय मंडळाने ठराव करत शासनाला सादर केला. हा ठराव करण्यासाठी पालकमंत्र्यांनी दबाव आणला असल्याचे मंडळातील सदस्यांनी सांगितले. मात्र, हा ठराव आपल्या मुळावर येण्याची भीतीदेखील संचालकांना होती. तरी हा ठराव केल्यानंतर आम्ही आमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याची भावना संचालक व्यक्त करीत आहेत. 

देशमुख यांची आॅगस्टमध्ये सेवानिवृत्ती  विद्यमान प्रशासक बी. जे. देशमुख यांची आॅगस्टमध्ये सेवानिवृत्ती असल्याची चर्चा सध्या बाजार समितीसह सहकार, पणन विभागात आहे. त्यामुळे प्रशासकीय मंडळ स्थापनेच्या हालचाली सुरू केली असल्याचे देखील बोलले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com