चार गावांतील आंतरपिकांच्या प्रात्यक्षिकातून फायदा

चार गावांतील आंतरपिकांच्या प्रात्यक्षिकातूनही फायदा
चार गावांतील आंतरपिकांच्या प्रात्यक्षिकातूनही फायदा

औरंगाबाद : आद्यरेषा प्रात्यक्षिकाच्या प्रयोगानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील चार गावांतील शेतकऱ्यांच्या शेतात आंतरपिकांची प्रात्यक्षिके घेतली गेली. या प्रात्यक्षिकांतून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आंतरपिकांमुळे १५ ते १८ टक्‍क्‍यांपर्यंत उत्पादकतेत वाढ नोंदली गेल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान केंद्र औरंगाबादच्या वतीने देण्यात आली.  

औरंगाबाद जिल्ह्यातील मुधळवाडी, बोरगाव अर्ज, लाखेगाव व देवगाव या चार गावांत ‘वनामकृवि’ परभणी अंतर्गत औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेतावर आद्यरेषा प्रात्यक्षिके घेण्यात आली. सुधारीत वाणांसोबतच आंतरपिकांविषयी असलेल्या या प्रात्यक्षिकांत जवळपास ५० शेतकऱ्यांच्या प्रत्येकी एक एकरावरील कपाशीत आंतरपीक मूग, उडीद व सोयाबीनमध्ये आंतरपीक तुरीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. याशिवाय विद्यापीठाने विकसित केलेल्या बीडीएन ७११ या तुरीच्या वाणासह हरभरा आकाश, सोयाबीन एमएयूएस १५८, ज्वारी मोती परभणी व कापूस पिकाची १६० शेतकऱ्यांच्या प्रत्येकी एक एकरावर प्रात्यक्षिके घेण्यात आली. 

जवळपास पाच वर्षांपासून घेण्यात येत असलेल्या कपाशीत आंतरपीक मूग, उडदाच्या प्रात्यक्षिकातील फायदे शेतकऱ्यांच्या लक्षात येत असल्याने गतवर्षीच्या खरिपात जिल्ह्यातील कपाशीच्या एकूण क्षेत्रापैकी जवळपास ६८ हजार एकरवर शेतकऱ्यांनी कपाशीत मूग, उडीद या पिकाचा आंतरभाव केल्याची माहिती सूत्रांनी दिली. कपाशीत आंतरपीक मूग किंवा उडदाचे पीक घेतल्याने सेंद्रिय कर्ब वाढीस मदत, सोबतच अडीच तीन महिन्याचे हे पीक जमिनीतील ओल टिकवून ठेवण्यास तसेच मूलस्थानी जलसंधारणासाठी कपाशी पिकात मूग, उडीद उपयोगी पडल्याचे निष्कर्षातून समोर आल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने देण्यात आली. 

सुधारीत वाणांचा वापर केल्याने तुरीच्या उत्पादकतेत २३ टक्‍के, हरभऱ्याच्या उत्पादकतेत २८ टक्‍के तर कपाशीच्या उत्पादकतेत १७ टक्‍क्‍यांपर्यत वाढ नोंदली गेली आहे. शिवाय कपाशीत आंतरपीक मुगाचे पीक घेतल्याने उत्पादकतेत १८ टक्‍के, कपाशीत उडदाचे आंतरपीक घेतल्याने उत्पादकतेत १६ टक्‍के तर सोयाबीनमध्ये आंतरपीक तुरीचे सुधारीत वाणाचे पीक घेतल्याने उत्पादकतेत १५ टक्‍के वाढ नोंदली गेली आहे. 

शिवाय अधिकचे उत्पन्न मिळवून देण्यातही आंतरपीक फायद्याचे ठरल्याचे कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी स्पष्ट केले. याविषयी नुकत्याच पार पडलेल्या विसाव्या वैज्ञानिक सल्लागार समितीच्या बैठकीत सादरीकरणही करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com