जाणून घ्या कमी अंडी उत्पादनाची कारणे, उपाय

Avoid crowding of hens in the shed.
Avoid crowding of hens in the shed.

देशी कोंबड्यांचे अंडी उत्पादन मुळातच कमी असते आणि व्यवस्थापनातील चुकामुंळे बऱ्याचदा अंडी उत्पादन अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. म्हणूनच अंडी उत्पादनाबद्दल शास्त्रोक्त माहिती असणे गरजेचे आहे. कमी अंडी मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे व्यवस्थापनाचा अभाव व ताणतणाव. कोंबड्यांतील ताणतणाव कसा कमी करता येईल यावर लक्ष दिल्यास अंडी उत्पादनात वाढ होईल. परसबागेतील कुक्कुटपालनामध्ये अंडी उत्पादन घेत असताना जास्तीत जास्त अंडी उत्पादन जर होत असेल तर हा व्यवसाय परवडतो, अन्यथा खर्च वजा जाता जास्त नफा मिळत नाही. देशी कोंबडी ही साधारण वयाच्या २० व्या आठवड्यात अंड्यावर येते आणि २४ व्या आठवड्यापासून पूर्ण क्षमतेने अंडी उत्पादन सुरू करते. सुरवातीला कमी व हळूहळू उत्पादनामध्ये वाढ होते. हा शरीरामध्ये होणारा नैसर्गिक बदल असतो. देशी कोंबड्या वर्षाकाठी १०० ते १३० अंडी देतात. या अंड्यांना बाजारात चांगली मागणी असते. अंडी उत्पादन कमी होण्याची कारणे व उपाय  कोंबड्यांचे शेड

  • कोंबड्यांच्या शेडजवळ कुत्र्या, मांजरांचा, वाहनांचा कर्णकर्कश आवाज येणे किंवा अचानक गोठ्यात अनोळखी व्यक्तीने प्रवेश करणे, या कारणांमुळे कोंबड्या घाबरतात व त्याचा अंडी उत्पादनावर परिणाम होतो.  
  • कोंबड्यांचे शेड हे मुख्य रस्त्यापासून सुरक्षित आणि दूर अंतरावर असावे, जेणेकरून आवाजाचा कमी त्रास होईल. तसेच इतर प्राण्यांपासून कोंबड्यांना खास करून अंड्यांवरील कोंबड्यांना त्रास होऊ नये याची विशेष काळजी घ्यावी.
  • तापमान व प्रकाश

  • साधारण फेब्रुवारी महिन्यापासून तापमान वाढीस सुरुवात होते. जसेजसे तापमान वाढेल तसतसे कोंबड्यांवरील तापमानाचा ताण वाढत जातो. ताणवाढीमुळे अंडी उत्पादनावर नकारात्मक परिणाम होतो.  
  • उच्च अंडी उत्पादनसाठी शेडमध्ये योग्य प्रमाणात प्रकाश उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. अंड्यावर आलेल्या कोंबड्यांना दिवसातील किमान १६ तास सलग प्रकाश दिसायला हवा. उष्ण तापमानाच्या काळात कोंबड्यांना थंड पाण्याचा पुरवठा करावा, तसेच ताण कमी करण्याची औषधे द्यावीत.  
  • शेडमध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. प्रकाशासाठी दिवसा नैसर्गिक सूर्यप्रकाश जास्तीत जास्त कसा उपलब्ध होईल याकडे लक्ष द्यावे व इतर वेळी बल्बची व्यवस्था करावी
  • कोंबड्यांसाठी अपुरी जागा

  • परसातील कुक्कुटपालन करताना कोंबड्यांना लागणाऱ्या जागेकडे जास्त लक्ष दिले जात नाही. त्यामुळे जागेअभावी कोंबड्या अंडी उत्पादनासाठी प्रवृत्त होत नाहीत.  
  • अंड्यांसाठी कुक्कुटपालन करत असताना प्रति कोंबडी किमान ४ ते ५ वर्ग फूट जागा पुरवावी. मुक्त पद्धत किंवा परसातील कुक्कुटपालन असेल तर रात्रीच्या निवाऱ्यासाठी किमान २ वर्ग फूट जागा प्रति कोंबडी उपलब्ध होणे अपेक्षित आहे.  
  • अपुरी जागा असेल तर आजार लवकर पसरतात, कमी जागेत जास्त पक्षी ठेवताना कपाट किंवा मचाणाचा वापर करावा.
  • कोंबड्यांची हाताळणी

  • लसीकरण करताना तसेच कोंबड्यांना पकडण्यासाठी योग्य प्रकारे न हाताळल्यास कोंबड्यांच्या शरीरावर ताण येतो आणि अंडी उत्पादन कमी होते.  
  • लस दिल्यानंतर नेहमी कोंबड्यांना ताण कमी करणारी औषधे आणि लिव्हर टॉनिक द्यावीत व इतर कारणांसाठी हाताळणी करावयाची असल्यास कोंबड्यांना शक्यतोवर रात्री हाताळावेत.
  • वयानुसार कोंबड्यांचे वर्गीकरण

  • कोंबड्यांच्या कळपामध्ये वयाप्रमाणे प्रत्येकाची पत ही ठरलेली असते. त्यामुळे मोठ्या कोंबड्या कधीच लहान पिलांना किंवा तलंगाना खपवून घेत नाहीत. अशा कोंबड्या एकत्र ठेवल्या की मोठ्या कोंबड्या लहान पिलांना चोच मारून जखमी करतात किंवा पाठीवरील पिसे उपसून उघड्या करतात. अशा संघर्षामुळे सर्वच कोंबड्यांना ताण येतो, त्यामुळे अंडी उत्पादन बऱ्याच वेळा कमी होते. म्हणून शक्यतो एकाच वयाच्या कोंबड्यांचा किंवा पिलांचा कळप असावा. त्यांना एकत्र मिसळू नये.
  • कोबड्यांचे आजार

  • कोंबड्यांना होणाऱ्या जीवाणूजन्य, विषाणूजन्य, परजीवीजन्य व बुरशीजन्य आजारामुळे अंडी उत्पादनावर वाईट परिणाम होतो. शेडमधील लिटर हे नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवावे. त्यात १० टक्के चुना मिसळावा.  
  • वेळोवेळी कोंबड्यांना जंतनाशक द्यावीत. योग्य वयात लसीकरण करून घ्यावे, जेणेकरून आजार नियंत्रित राहतील.
  • संपर्कः डॉ. गोपाल मंजूळकर, ९८२२२३१९२३ (विषय विशेषज्ञ (पशुविज्ञान), कृषी विज्ञान केंद्र, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com