दहा दिवस झाले; नरभक्षक बिबट्या सापडेना..

गेल्या दहा दिवसांपासून शोध मोहीम राबवूनही करमाळा तालुक्‍यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अद्यापही जेरबंद करण्यात किंवा ठार मारण्यास वन विभागाला यश आलेले नाही.
नरभक्षक बिबट्या सापडेना, शेतकऱ्यांमध्ये दहशत
नरभक्षक बिबट्या सापडेना, शेतकऱ्यांमध्ये दहशत

सोलापूर : गेल्या दहा दिवसांपासून शोध मोहीम राबवूनही करमाळा तालुक्‍यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अद्यापही जेरबंद करण्यात किंवा ठार मारण्यास वन विभागाला यश आलेले नाही. त्यामुळे करमाळ्यातील शेळगाव, चिखलठाण, वांगी, बिटरगाव आदी परिसरात शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या भीतीने शेताला जाण्यास शेतकरी धजावत नाहीत, परिणामी, शेतीची कामे रेंगाळली आहेत.  करमाळा तालुक्‍यात आतापर्यंत तिघांचे बळी या बिबट्याने घेतले आहेत. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही दोन दिवसापूर्वी करमाळ्यात आपतग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन गावकऱ्यांना दिलासा दिला. तसेच दोन दिवसात बिबट्याचा बंदोबस्त करू, असे आश्‍वासन दिले. पण अद्यापही तो काही हाती लागत नसल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्यात शेळगाव आणि चिखलठाण येथे बिबट्याने हल्ला केल्यानंतर आणि त्याचे वास्तव्य एका उसाच्या फडात असल्याचे समजल्यानंतर हा ऊस पेटवून शार्पशुटरने नेम धरला. पण तो त्यातूनही निसटला. त्यानंतर पुन्हा शुक्रवार (ता.११) तो बिटरगाव (वा) येथेही आढळल्यानंतर त्याच्यावर फायर करण्यात आले,मात्र बिबट्या पुन्हा एकदा चलाखीने पळून गेला. सलग दहा दिवसापासून त्याचा शोध घेतला जातो आहे. तसेच त्याच्यावर नेम धरला जातो आहे. पण तो हाती काही लागत नाही. शनिवार (ता.१२) दिवसभर वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बिटरगाव (वा), सांगवी नं.२ परिसरात तळ ठोकून पहारा दिला. पण तो तिथे सापडला नाही. सध्या बिबट्याचा मुक्काम भिवरवाडी, ढोकरी, वांगी परिसरात असल्याचे सांगण्यात येत आहे.  बिबट्याच्या शोधासाठी अशी आहे यंत्रणा  करमाळा तालुक्‍यात सध्या वनविभागाचे सुमारे २०० हून अधिक अधिकारी, कर्मचारी पहाऱ्यावर आहोत. तसेच बिबट्याला पकडण्यासाठी २१ पिंजरे, ३ ड्रोन कॅमेरे, ४२ ट्रप कॅमेरे, ५ शार्पशुटर, बेशुद्ध करणारी २ पथके, १ श्‍वान पथक व १६ वन विभागाची पथके, राज्य राखीव दलाची एक तुकडी आणि ग्रामस्थ बिबट्याच्या शोधात आहेत. तरीही बिबट्या जेरबंद होत नाही किंवा त्याला ठार होऊ शकत नाही, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. शुक्रवारी फायर केलेल्या ठिकाणावरून पाचशे ते सहाशे फूट अंतरावर शेतकऱ्यांना सायंकाळी सहाच्या सुमारास ढोकरी, भिवरवाडी भागात बिबट्या दिसला, पण वनविभागाची यंत्रणा येईपर्यंत तो पसार झाला. अद्यापही तो सर्वांनाच गुंगारा देऊन निसटतो आहे. पण या सगळ्यात शेतकऱ्यांमध्ये मात्र भीतीचे आणि दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. शेतात उसाला पाणी देणे, ऊसतोड करणे यासारखी कामेही रखडली आहेत. अनेक भागात जनावरांना शेतात चारायला न्यायचे म्हटले तरी भीती बसली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे ऑपरेशन पूर्ण करण्याची मागणी होते आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com