ग्रामसमृद्धीच्या शिदोरीसह सरपंच परतले गावाकडे

अॅग्रोवन सरपंच महापरिषद २०१८ क्षणचित्र
अॅग्रोवन सरपंच महापरिषद २०१८ क्षणचित्र

पुणे  : ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या सरपंच महापरिषदेच्या निमित्ताने आळंदीत भरलेल्या ग्रामकुंभातून मौल्यवान माहितीचा मेवा घेत सरपंच मंडळी गावाकडे परतली. ग्रामसमृद्धीची शिदोरी गोळा करताना दुष्काळाविरोधात लढण्याची नवी उमेद सरपंचांनी मिळविली. दोन दिवस चाललेल्या या महापरिषदेचा समारोप रविवारी (ता.२५) सायंकाळी उत्साही वातावरणात झाला.

सरपंच महापरिषदेचे मुख्य प्रायोजक फोर्स मोटर्स लि., पॉवर्ड बाय जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. होते. प्रायोजक सोनाई पशू आहार, मारुती सुझुकी इंडिया लि., बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., विक्रम टी, डॉलिन - सिडलर इलेक्ट्रॉनिक्स, ऊर्जा बायोसिस्टिम्स प्रा. लि., राज्य जलसंधारण विभाग, रोजगार हमी योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान होते.

राज्यभरातील निवडक उच्च शिक्षित, युवा सरपंच, तसेच महिला सरपंचांनी या ग्रामकुंभात उत्साहाने भाग घेतला. ग्रामविकासासाठी अभ्यास, संघर्ष आणि सकारात्मक विचार आणि जोरदार पाठपुरावा अत्यावश्यक ठरतो, असा मंत्र मिळाल्याने सरपंच खूश झाले. भारावलेल्या सरपंचांनी परिषदेच्या समारोप सोहळ्यात टाळ्यांच्या कडकडाटात  ‘सकाळ-अॅग्रोवन’ टीमचे अभिनंदन केले.

आळंदीला आल्याने माउलींचे दर्शन, नवे सरपंच मित्र आणि ग्रामविकासाच्या मौल्यवान टिप्स, असे तिहेरी लाभ झाल्याचे सरपंच सांगत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच पोपटराव पवार, चंदू पाटील, जयंत पाटील कुर्डूकर यांच्या अभ्यासपूर्ण भाषणातून भरपूर माहिती मिळाली. उत्साही सरपंच त्यानंतरही या मान्यवरांना व्यक्तिशः भेटत मार्गदर्शन घेत होते. त्यांच्याबरोबर ग्रुप फोटो, सेल्फी घेत आमच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण असल्याची भावना अनेक सरपंचांनी व्यक्त केली. राज्यातील कृषी व ग्रामविकासाची निरंतर चळवळ असा लौकिक मिळालेल्या या उपक्रमातून प्रशिक्षण घेतलेल्या सरपंचांची संख्या आता आठ हजारांवर पोचल्याचे ‘अॅग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी समारोप सोहळ्यात सांगितले.

“शहरी भागाला सतत संधी मिळते. मात्र, गावे डावलली जातात. शेती भकास होतेय. त्यामुळे सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार आणि व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकासासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. हा वसा यापुढेही सुरू ठेवू,” असे उद्गार श्री. चव्हाण यांनी काढले. त्यामुळे भारावलेल्या सरपंचांनी टाळ्यांचा कडकडाट करीत पाठिंबा दर्शविला.  

अडचणींचा डोंगर असला, तरी गावात सुविधांबरोबरच सामाजिक आणि आर्थिक विकासाची कामे कशी करावीत, याचे सूत्र सरपंचांना मिळाले. ऐन दुष्काळातही गावाच्या मदतीसाठी सरकार आपल्या पाठीशी उभे आहे, याचा विश्वास या महापरिषदेत मिळाल्याने सरपंच मंडळी नवी उमेद घेत गावाकडे परतत होती.

`सकाळ - ॲग्रोवन`चा जयघोष समारोप होताच सरपंचांनी `अॅग्रोवन`च्या टीमवर अभिनंदनाचा वर्षाव केला. यात युवा, तसेच महिला सरपंच आघाडीवर होते. विशेष म्हणजे `सकाळ-अॅग्रोवन`चा विजय असो, अशा घोषणा देत सरपंचांनी आपल्या दोन दिवस मिळालेल्या ग्रामविकासाच्या शिदोरीविषयीची कृतज्ञता व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com