राज्यभरातील मालवाहतूक ठप्प

राज्यभरातील औद्योगिक कंपन्यांचा परिसर आणि त्याला जोडले जाणारे मुख्य रस्ते यांना सध्या अवकळा आली आहे. या भागातून फिरताना मालवाहतूक करणाऱ्या परराज्यातील चालकांचे केविलवाणे चेहरे दिसतात.
मालवाहतूक ठप्प
मालवाहतूक ठप्प

पुणे : राज्यभरातील औद्योगिक कंपन्यांचा परिसर आणि त्याला जोडले जाणारे मुख्य रस्ते यांना सध्या अवकळा आली आहे. या भागातून फिरताना मालवाहतूक करणाऱ्या परराज्यातील चालकांचे केविलवाणे चेहरे दिसतात. या चालकांवर किमती मालाच्या ट्रकची जबाबदारी आहे. कोरोनाची दहशत मनावर आहे. दूर गावाकडे असलेल्या कुटुंबाचीही काळजी सतावत आहे. लॉकडाउनमुळे त्यांची मनःस्थिती बिघडली आहे. कोरोनापेक्षा भुकेची भीती साऱ्यांना आहे. दहा ते चाळीस-पन्नास चाकांची ही अवजड वाहने रस्त्याकडेला उभी आहेत. बहुसंख्य वाहनांमध्ये अनेक प्रकारचा माल आहे. एरवी काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पळणारी वाहने २१ दिवसांपासून जागेवरच आहेत. चालकाची केबिन म्हणजे त्याचे एक छोटेखानी घर झाले आहे. त्यात विविध देवादिकांच्या प्रतिमा, त्यांना दररोज पूजेचा हार घातला जातो. मात्र, आता सर्वच गाड्यांमधील हार सुकले आहेत. जेवण बनविण्यासाठीचा शिधा आणि छोट्या सिलिंडरमधील गॅस संपलेला असल्याने चालकांचे चेहरे सुतकी बनले आहेत.  औद्योगिक परिसराच्या आवारात किंवा वाहतुकनगरीत थांबून असलेल्या चालकांना काहीजण अन्नाची पाकिटे व पाण्याच्या बाटल्या देतात. मात्र, महामार्गावर किंवा शहर व गावाबाहेर अडकून पडलेल्या चालकांचे काय? याबाबत पंजाबमधील हरविंदरसिंग सांगतो, ‘‘घरातून बाहेर पडताना ठरलेले असते, की इतक्‍या दिवसांचा प्रवास आहे. मग तेवढ्यापुरतेच कपड्यांपासूनचे साहित्य सोबत असते. मात्र, परिस्थिती अशी आहे, की लॉकडाउनमुळे आम्हाला जागच्या जागी थांबावे लागले. परंतु आडजागी अडकून पडल्याने गाव कुठे आहे, मदत कुठे मिळेल हेच माहीत नाही. गाडी सोडून कुठे जाता येत नाही. कारण माल भरलेला आहे. तो लुटला जाण्याची भीतीही आहे.’’ उत्तर प्रदेशमधील ४३ वर्षीय बाबूरामची कथा तर वेगळीच आहे. ‘‘कंपनीत ट्रक खाली करून निघणार होतो तेवढ्यात लॉकडाउन सुरू झाला. कोरोनाची साथ, पंतप्रधानांची लॉकडाउनची केलेली घोषणा मला काहीच माहीत नव्हते. इतर ट्रकचालकांकडून समजले. कामचलावू लिहिता, वाचता येते. मात्र, बाहेर काय सुरू आहे समजलेले नाही. कधी परवानगी मिळतेय माहीत नाही. मात्र, मला तरी जायचे आहे. माझ्याकडील पैसे संपले आहेत. घरी न्यायला काहीच उरलेले नाही. दिवसातून एकदा जेवण मिळते; पण घास घशाखाली उतरत नाही. बायको, मुलांचे काय हाल होत असतील याची कल्पना करवत नाही,’’ अशी खंत तो व्यक्त करतो. चालक सोडून जाण्याच्या मनःस्थितीत लॉकडाउनच्या या काळात चालकांची अवस्था दयनीय झाली आहे. कपडे मळलेले, दाढी वाढलेली, अंघोळ नाही. त्यातच कोरोनाची भीती असल्याने कोणी मदत करायला येत नाही. जागोजागी पोलिस आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर जीव वाचवून आहे त्याठिकाणीच ट्रक, कंटेनर सोडून चालत गावी जाण्याच्या मानसिकतेत काहीजण आहेत. अनेक चालक निघून गेले आहेत. त्यामुळे ट्रक व त्यामधील माल असुरक्षित झाला आहे.  तर चालक फिरकणारच नाहीत... लॉकडाउन वगैरे ठीक आहे. मात्र, तो किती दिवस ठेवायचा याला मर्यादा असावी. थोड्याथोड्या दिवसांचा ब्रेक घेऊन मालवाहतुकीचा हा व्यवसाय हळूहळू सुरू केला पाहिजे. उद्योग क्षेत्रातील मोठ्या साखळीतील ही एक कडी आहे. या कडीवर काही लाख कुटुंबांचे पोट अवलंबून आहे. आता एक ट्रक थांबला म्हणजे पंक्‍चरपासून दुरुस्तीपर्यंत आणि हमालांपासून कामगारांपर्यंतच्या घटकातील ४० लोकांचे हात विनाकाम आहेत. ही सर्व चाके सुरू राहावीत, अशीही अपेक्षा ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांची आहे. आता या लॉकडाउनवर तत्काळ निर्णय घ्यायला हवा. कारण आता उशीर झाला, तर चालक किमान दोन महिने तरी फिरकणार नाहीत, अशीही भीतीही एका ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाने व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com