नागपूर जिल्हा परिषदेतही महाआघाडी

नागपूर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचे वर्चस्व
नागपूर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचे वर्चस्व

नागपूर : नागपूर जिल्हा एकेकाळी भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला होता. गत विधानसभेत एकूण १२ पैकी ११ जागांवर भाजपने विजय मिळविला होता. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नागपूर जिल्ह्यात सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजपला जिल्हा परिषद निवडणुकीत देखील पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. 

जिल्हा परिषद निवडणूक निकालात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीने भाजपची धूळधाण करीत एकहाती सत्ता मिळविली आहे. या निकालामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जोरदार धक्का बसला आहे. या विजयामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. 

गेली पाच वर्षे नागपूर जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता होती. यानंतर सुमारे अडीच वर्षे मुदतवाढ मिळाल्याने तब्बल साडेसात वर्षे भाजपने नागपूर जिल्हा परिषदेवर राज्य केले. मात्र, आता कॉंग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत येणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. 

जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाआघाडीने मुसंडी मारली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांत बहुतांश ठिकाणी कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर, उमरेड या तालुक्‍यांत आघाडीने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे. 

अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी मेंटपांजरा सर्कलमधून विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे प्रवीण आडकीने यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेश बंग यांचे पुत्र दिनेश यांनी रायपूर जिल्हा परिषद सर्कलमधून विजय मिळवला आहे. त्यांनी कॉंग्रेसचे बाबा आष्टणकर यांचा पराभव केला. कॉंग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे हे केळवदमधून विजयी झाले. कॉंग्रेसचे नाना कंभाले यांनी कोराडीमधून विजय मिळविला. माजी मंत्री चंदशेखर बावनकुळे हे कोराडीचे रहिवाशी आहेत, हे विशेष. 

भाजपच्या बबिता गजबे नरखेड तालुक्‍यातील बेलोना सर्कलमधून अटीतटीच्या लढतीत विजयी झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी धक्का मानला जात आहे. भाजपने पाच जागांवर विजय मिळविला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com