ग्लायफोसेट बंदीबाबत पुन्हा चाचपणी

ग्लायफोसेट
ग्लायफोसेट

पुणे: राज्यात ग्लायफोसेट तणनाशकावर बंदी न घालण्याचा निर्णय कृषी खात्याने घेतला असला तरी पंजाबमध्ये बंदी लागू करण्यात आल्यामुळे कृषी विभागाने देखील बंदीबाबत पुन्हा माहिती घेणे सुरू केले आहे.  ‘‘ग्लाययफोसेटवर बंदी घालण्याबाबत कृषी विभागाने यापूर्वी हालचाली सुरू केल्या होत्या. तथापि, मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही ठोस पुरावा हाती येत नसल्यामुळे बंदी घालण्याचा निर्णय रेंगाळला आहे. मात्र, पंजाबच्या कृषी विभागाने बंदीचा निर्णय घेतला असल्यास आम्हालादेखील पुन्हा आढावा घेता येईल,’’ अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.  राज्यात मोन्सॅन्टोसह ४० कंपन्यांकडून शेतकऱ्याना ग्लायफोसेटचा पुरवठा केला जातो. मात्र, ग्लायफोसेटचे उत्पादन व विक्री करणाऱ्या कंपन्या केंद्रीय कीटकनाशके नियम १९७१ मधील १९ व्या नियमाची पायमल्ली करीत असल्याचा ठपका या आधी कृषी खात्याने ठेवला होता. मात्र, ग्लायफोसेटवर बंदी आणण्यासाठी सुरू केलेली कायदेशीर कारवाई कृषी खात्याने अचानक सैल केली. त्यामुळे या कंपन्यांना दिलासा मिळाला होता. विशेष म्हणजे कृषी विभागाने महाराष्ट्रात ग्लायफोसेट बंदीबाबत कायदेशीर कामकाज सुरू करून पुन्हा स्थगित केले आहे. राज्यात ग्लायफोसेटची विक्री सुरू ठेवण्यास कृषी विभागाने अद्याप परवानगी कायम ठेवली आहे. मात्र, आधी घेतलेल्या सुनावणीचा लेखी निकाल अजूनही कंपन्यांच्या हातात मिळालेला नाही.  मानवी आरोग्याला घातक ठरणारे विशेषतः कार्सिनोजेनिक म्हणजे कर्करोग होणारे घटक ग्लायफोसेटमध्ये असल्याचा लेखी पावित्रा याआधी कृषी विभागाने घेतला होता. मात्र, बंदी आणल्यास काही कायदेशीर बाबी उद्भवतील अशी धास्ती वाटल्याने कृषी खात्याने या तणनाशकावर महाराष्ट्रात बंदी आणलेली नाही. राज्यात दरवर्षी ३५ लाख लिटर्सच्या आसपास ग्लायफोसेट विकले जात असून शेतकऱ्यांकडून किमान ७०० कोटी रुपये या तणनाशकाच्या खरेदीपोटी शेतकऱ्यांकडून मिळतात.  आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थेने कर्करोगास कारणीभूत ठरलेल्या घटकांची यादी तयार केली आहे. ग्रुप २ए या नावाने प्रसिद्ध असलेल्या या यादीनुसार ग्लायफोसेटदेखील त्यात समाविष्ट होऊ शकते. म्हणजेच ग्लायफोसेट कार्सोजेनिक असल्याचा पावित्रा पंजाब शासनाने घेतला आहे.  ‘‘तणनाशक उत्पादक कंपन्यांना ग्लायफोसेटचा उत्पादन व विक्रीचा परवाना केवळ चहा पिकावर तसेच मोकळ्या जागेवर वापरण्यासाठीच दिलेला आहे. केंद्रीय कीटकनाशके मंडळ व नोंदणी समितीने (सीआयबी-आरसी) तसे स्पष्ट नमूद केलेले असल्यामुळे आम्ही ग्लायफोसेटवर राज्यभर बंदी आणली आहे,’’ असे पंजाबने दोन दिवसांपूर्वीच घोषित केले आहे. पंजाबच्या निर्णयाने खळबळ सूत्रांच्या म्हणण्यानुसार, देशात ग्लायफोसेटचा वापर मोठ्याप्रमाणात करणाऱ्या पंजाबमध्ये ग्लायफोसेटवर बंदी आल्यामुळे तणनाशक उद्योगामध्ये खळबळ उडाली आहे. यामुळेच महाराष्ट्रातदेखील पुन्हा आता बंदीची चर्चा सुरू झाली आहे. चंदीगडच्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेने ग्लायफोसेटमध्ये मानवी डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लाच्या म्हणजेच डीएनएमध्ये आघात करण्याची क्षमता असल्याचा अहवाल दिल्याने पंजाबमध्ये बंदीचा निर्णय घेण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com