‘महारयत’विरोधात इस्लामपुरात मोर्चा

मोर्चा
मोर्चा

इस्लामपूर, जि. सांगली ः कमी गुंतवणुकीत कडकनाथ कोंबडी पालन करून जादा पैसे कमवण्याचे अामिष दाखवत कर्नाटकसह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या महारयत ॲग्रो कंपनीच्या विरोधात फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. ३०) इस्लामपूर (ता. वाळवा) येथील पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. राज्यातील विविध जिल्ह्यांसह कर्नाटक व केरळ मधून फसवणूक झालेले शेतकरी या मोर्चात सहभागी झाले. महारयत ॲग्रो कंपनीच्या संचालकांसह या घोटाळ्यातील सूत्रधारांवर मोकांतर्गत कारवाई करून आम्हाला न्याय द्या, अशी मागणी या वेळी मोर्चेकऱ्यांनी केली.  येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ विविध ठिकाणाहून आलेले शेतकरी जमले होते. त्यानंतर ‘‘महारयत ॲग्रो कंपनीच्या संचालकांचा निषेध असो’’ अशा घोषणा देत ‘कोंबडी पळाली, तंगडी धरून लंगडी घालाया लागली '' या गाण्याच्या जयघोषात हा मोर्चा पोलिस ठाण्यावर पोचला. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच अडवले. या वेळी काही शेतकऱ्यांनी आजच्या आज संबंधितांच्यावर गुन्हा दाखल करून आम्हाला त्या फिर्यादीची कॉपी मिळावी, असा आग्रह धरला.  प्रहार संघटना, स्वाभीमानी शेतकरी संघटना, पुरोगामी चळवळ, मराठा क्रांती मोर्चा व काही स्थानिक संघटनांनी यात पुढाकार घेतला. पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी संबंधीतांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांची मालमत्ता जप्त करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची मोर्चेकऱ्यांना ग्वाही दिली. प्रत्येकाने आपल्या तक्रारीचा अर्ज जमा करावा, असे आवाहन पोलिसांनी केले. या वेळी शेकडो अर्ज जमले. लवकरच या अर्जावरून संबंधितांच्यावर गुन्हा दाखल करू, असे आश्‍वासन पोलिसांनी दिले. या मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी पैसे कसे जमा केले याचा पाढाच पोलिसांच्यासमोर वाचला.  या वेळी गोटखिंडी येथील पारधी समाजातील ममताज पवार म्हणाल्या, माझा नवरा चोरीमारीच्या भीतीने उसात व शेतात राहून मरण पावला. पोरं जगवण्यासाठी आम्ही चोरीचा मार्ग सोडून समाजात चांगल्या मार्गाने जगायचं असं ठरवले. मात्र महारयत ॲग्रो कंपनीच्या अमिषाला बळी पडून गोटखिंडी येथे कडकनाथ कोंबडीचे शेड केले. कर्ज काढून, उसने पैसे घेऊन २ लाख रुपये गुंतवणूक केली. २-२ किलो मीटर अंतरावरून पाणी आणून कोंबड्यांना पाजले आणि आता कंपनीने आमचा माल स्वीकारण्यास व पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. आम्ही जगायचं कसं? आमच्या लोकांच्यावर मोका कारवाई करता, मग इतक्‍या लोकांना फसवलेल्या रयत ॲग्रो कंपनीच्या लोकांच्यावर मोकांतर्गत कारवाई का होत नाही. मराठवाड्यातून आलेला एक युवा शेतकरी आपली कैफियत मांडताना म्हणाला, मी सुशिक्षित बेकार आहे. नोकरी लागत नाही म्हणून रयत ॲग्रो कंपनीच्या अमिषाला बळी पडत ३ लाख रुपये कर्ज घेतले व कडकनाथ कोंबडी पालन केले. आज आमचे घरदार यातून बाहेर पडण्याच्या विवंचनेत आहे. कंपनीने आमची फसवणूक केली.  मराठा क्रांती मोर्चाचे दिग्वीजय पाटील म्हणाले, कडकनाथ घोटाळ्यात अनेक मोठ्या हस्तींचा सहभाग आहे. त्याची सखोल चौकशी होऊन संबंधीतांवर गुन्हे दाखल करावेत अन्यथा यापुढे या लोकांना न्याय मिळेपर्यंत तीव्र आंदोलन छेडू. सदाभाऊंनी लक्ष द्यावे महारयत ॲग्रो कंपनीने आम्हाला फसवून रस्त्यावर आणले. संबंधितांच्यावर गुन्हे दाखल करून आमचे पैसे परत मिळण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या मोर्चात सहभागी व्हायला पाहिजे होते. अजूनही सदाभाऊंनी यात लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com