इंधन दरवाढीविरोधात मुंबई, ठाण्यात निषेध आंदोलन

मुंबई येथे आंदोलन
मुंबई येथे आंदोलन

मुंबई   : पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवारी (ता.१०) पुकारलेल्या ‘भारत बंद’ला मुंबईसह ठाणे, नवी मुंबई शहरांमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. या वेळी ठिकठिकाणी निषेध आंदोलने करण्यात आली. या `बंद`ला मनसेसह राज्यातील विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे ठिकठिकाणी मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

राज्यातील विविध राजकीय पक्षांनी `बंद`ला पाठिंबा जाहीर केला होता, तसेच जनतेने मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले होते. काँग्रेसच्या आंदोलनाला राज्यातील विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. ‘भारत बंद’ला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष,  प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी या पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

२०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत सुमारे ११० डॉलर प्रतिबॅरेल होती, तेव्हा मुंबईत पेट्रोलचा दर ८० रुपये, तर डिझेलचा दर साधारणपणे ६४ रुपये प्रतिलिटर होता. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत सुमारे ८० डॉलर प्रतिबॅरेल म्हणजेच २०१४च्या तुलनेत ३० डॉलरने कमी आहे. तरीही आज मुंबईत पेट्रोलचे दर ८७.८९ रुपये आणि डिझेलचे दर ७७.०९ रुपये एवढे आहेत. सरकार इंधनावर कर आणि अधिभार लावून सर्वसामान्य जनतेची लूट करीत आहे. इंधन दरवाढीमुळे वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारने तत्काळ पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे व सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण मुंबई येथे, साताऱ्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नगरमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, नागपूरमध्ये सरचिटणीस मुकुल वासनिक आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, आंदोलन सुरू होण्याआधीच पोलिसांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना राहत्या घरातून ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन डी. एन. नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. बंदकाळात विरोधी पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून निषेध नोंदवत होते. कार्यकर्त्यांनी लोकल, मेट्रो रेल्वे, मुंबई-पुणे महामार्ग बंद करण्याचा प्रयत्न केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com