नगर जिल्ह्यात इंधन दरवाढीविरोधात आंदोलने

नगर येथे आंदोलन
नगर येथे आंदोलन

नगर  ः इंधन दरवाढीसह महागाईच्या विरोधात सोमवारी (ता.१०) नगर शहरासह जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेसह अन्य पक्षांनी आंदोलन केले. शहरासह जिल्ह्याच्या अन्य भागात ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेसह अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित ठिय्या आंदोलन केले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणीत, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरला आंदोलनात सहभाग घेतला.

इंधन दरवाढ होत असल्याने महागाई वाढत असून त्यामुळे जनता त्रस्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, काँग्रेस व अन्य पक्षांनी सोमवारी ‘बंद’ पुकारला होता. या ‘बंद’ला नगर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. कर्जत येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. श्रीरामपुरला ‘बंद’ पाळण्यात आला. पाथर्डीला ‘बंद’ पाळून मोर्चा काढण्यात आला. श्रीगोंदा, बेलवंडी, लोणी, पारगाव, लोणी, संगमनेर, पारनेर, राहुरी, जामखेड, शेवगाव तालुक्‍यातही काही भागात बंद पाळण्यात आला. लोणी येथील आंदोलनात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, संगमनेर येथील आंदोलनात माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सहभाग घेत केंद्र व राज्य सरकारच्या भूमिकेवर आणि वाढत्या महागाईवर टीका केली.

नगरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार संग्राम जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णा शेलार यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठिय्या अंदोलन केले. अर्थव्यवस्थेचा तोटा भरून काढण्यासाठी इंधनावर भरमसाठ कर लावल्याने दरवाढ झाल्याचा आरोप करीत महागाई, बेरोजगारी, रुपयाचे अवमूल्यन, जातीभेद, अस्थिरतेला सर्वसामान्य जनता वैतागली आहे. आता केंद्र व राज्यातील सरकार खाली खेचण्याची गरज आहे, असे मत या वेळी प्रमुख नेत्यांनी व्यक्त केले. ‘बंद’ला जिल्ह्यामध्ये फारसा प्रतिसाद मिळाला नाही. बऱ्याच ठिकाणी बाजारपेठ सुरळीत सुरू होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com