पुणे जिल्ह्यात ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद

पुणे जिल्ह्यात आंदोलन
पुणे जिल्ह्यात आंदोलन

पुणे : इंधन दरवाढ आणि महागाईच्या निषेधार्थ काॅंग्रेससह विविध राजकीय पक्षांनी साेमवारी (ता.१०) पुकारलेल्या ‘बंद’ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्‍ह्यातील विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी रास्ता राेकाे, निदर्शने करीत माेदी सरकारविराेधात घाेषणाबाजी केली. या वेळी चाेख पाेलिस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. अनेक ठिकाणी बाजारपेठा सुरळीत हाेत्या; तर सुरक्षेच्या कारणास्तव विविध शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली हाेती.

बारामतीत प्रशासनास निवेदन बारामती ः इंधन दरवाढीविरोधात समविचारी विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या देशव्यापी ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार ‘बंद’ची हाक असूनही सुरू ठेवले होते, व्यापाऱ्यांच्या तीव्र भावना विचारात घेता नाराजी पत्करायला नको यामुळे राजकीय पक्षांनीही कोणावरही ‘बंद’साठी दबाव न आणल्याने शहरात बंद शांततेत पार पडला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती संजय भोसले, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांच्यासह  पदाधिकाऱ्यांनी प्रशासनास निवेदन देत इंधन दरवाढीचा निषेध केला. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सुधीर पाटसकर यांनीही या ‘बंद’ला पाठिंबा असल्याचे जाहीर करत भिगवण चौकात दरवाढीविरोधात निदर्शने केली.

भोर येथे मोर्चा भोर ः शहरात ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दुपारी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या विरोधात शहरातून मोर्चा काढण्यात आला आणि तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी ग्रामीण भागातून अनेक शेतकरी भोरमध्ये येणार असल्याने काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली. दुपारी आमदार संग्राम थोपटे य़ांच्या नेतृत्वाखाली चौपाटीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चास सुरवात झाली. नगरपालिका चौका-मंगळवार पेठमार्गे मोर्चा राजवाडा चौकात आल्यानंतर तेथे भाजप सरकार आणि आमदार राम कदम यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर आमदार संग्राम थोपटे य़ांच्या हस्ते तहसीलदार अजित पाटील यांना निवेदन देण्यात आले.

शिवगंगा खोऱ्यात अल्प प्रतिसाद खेड-शिवापूर ः इंधन दरवाढीविरोधात विरोधी पक्षांनी पुकारलेल्या ‘बंद’ला सोमवारी शिवगंगा खोऱ्यात अल्प प्रतिसाद मिळाला. पुणे-सातारा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बंद आंदोलनात सहभागी झाले होते. ‘बंद’च्या पार्श्वभूमीवर पुणे-सातारा रस्त्यावर सोमवारी सकाळपासून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पुणे-सातारा रस्त्यावर वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होती. तसेच या भागातील व्यवसाय, शाळा आणि महाविद्यालयेही सुरळीत सुरू होती. सकाळी अकराच्या सुमारास शिवगंगा खोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे खेड-शिवापूर पोलिस चौकीसमोर काही वेळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, अभयसिंह कोंडे, अविनाश बांडेहवलदार, जितेंद्र कोंडे, संदीप मुजुमले, राजेंद्र पवार, मधुकर शिरोळे, सोमनाथ वाव्हळ, उमेश घोडके, सचिन धोंडे, नामदेव पवार आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

वाल्हे येथे निषेध सभा वाल्हे (ता. पुरंदर) ः देशामधील पेट्रोल, डिझेल, गॅस आदींचे दर गगनाला भिडलेले असल्याने महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे अर्थकारण बिघडले आहे. याचा जाब सरकारला विचारण्यासाठी विरोधी पक्षांनी भारत बंदचे आवाहन केले आहे. त्या बंदला पाठिंबा देण्यासाठी वाल्हे (ता.पुरंदर) येथे महागाई राक्षसाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन व निषेध सभेचे आय़ोजन केले होते.

चाकण परिसरात अत्यल्प प्रतिसाद चाकण (ता. खेड) ः इंधन दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात काॅंग्रेस व इतर पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला चाकण व परिसरात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. बंदच्या पार्श्वभूमीवर जनजीवन तसेच दैनंदिन व्यवहार, वाहतूक सुरळीत सुरू हाेती. औद्योगिक वसाहतीतील कंपन्याही नेहमीप्रमाणे सुरू होत्या. याबाबत सहायक पोलिस आयुक्त चंद्रकांत अलसटवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी सांगितले की, चाकणला बंदचा परिणाम जाणवला नाही. ‘बंद’दरम्यान काेणतीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून माेठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com