पणन सुधारणांविरोधात व्यापारी, माथाडींचा `बंद`

सोलापूर बाजारसमिती ठप्प
सोलापूर बाजारसमिती ठप्प

पुणे ः राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या पणन सुधारणांमुळे बाजार व्यवस्था उद्‌ध्वस्त होऊन शेतकरी भरडले जाणार आहे. त्यामुळे या सुधारणा रद्द कराव्यात या मागणीसाठी मुंबई, पुणे, नगर, लातूर, हिंगोली, परभणी, सोलापूर, सांगली, औरंगाबाद, जालना, बीडसह राज्यातील विविध बाजार समित्यांमधील अडते, व्यापारी आणि माथाडी कामगार संघटनांनी मंगळवारी (ता. २७) बंद पुकारला होता. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. यामुळे विविध बाजार समित्यांमधील व्यवहार ठप्प झाले होते.  

दरम्यान, उशीराच्या वृत्तानुसार, महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले.

प्रस्तावित पणन सुधारणांबाबत राज्य शासनाने नुकताच एक अध्यादेश काढला आहे. यामध्ये ई - नामद्वारे आॅनलाइन लिलाव, खरेदी-विक्री, शेतकऱ्यांच्या शेतीमालाची किंमत दोन लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास अडत्यास विक्रेत्यांच्या वतीने कोणतीही रक्कम स्वीकारण्यास अथवा स्वत:च्या खात्यातून शेतकऱ्यांना रक्कम अदा करण्यास मनाई करण्यात आली. या विविध सुधारणा शेतकऱ्यांसाठी अडचणीच्या ठरणार असल्याने या सुधारणाच रद्द कराव्यात, अशी मागणी विविध बाजार समित्यांमधील आडते आणि व्यापारी संघटनांनी केल्या आहेत.

पुणे बाजार समितीमधील छत्रपती शिवाजी आडते असोसिएशन, दि पूना मर्चंटस चेंबर आणि विविध कामगार संघटनांनी बंद ठेवल्याने बाजार आवारात शुकशुकाट होता. प्रस्तावित पणन सुधारणांमधील त्रुटींबाबत संघटनांनी पणनमंत्री सुभाष देशमुख आणि पणन संचालक दीपक तावरे यांना निवेदन दिले आहे.

सांगली बाजार समितीमध्ये जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने हमाल, तोलाईदार, महिला, माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन करीत मार्केट यार्डात मोर्चा काढला. त्यामुळे बाजार समितीत संपूर्ण सौदे, व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. बंदमध्ये मिरज, कुपवाड, गणपती पेठमधील हमालांनी सहभाग घेतला होता. या वेळी सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.

मुंबई (वाशी) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही सर्व संघटनांनी बंदमध्ये सहभागी होत कडकडीत बंद पाळला. बाजार समितीमधील व्यापारी संघटनेने यापूर्वीच सहकारमंत्री सुभाष देशमुख, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटून पणन सुधारणामधील त्रुटींबाबत चर्चा केली आहे. माथाडी कायद्यातील बदलांच्या विरोधात लातूर बाजार समितीमधील कामगारांनी मंगळवारी (ता. २७) पुकारलेल्या बंदमुळे व्यवहार ठप्प झाले होते. सरकारने माथाडी कायदा, बाजार समितीचा कायदा व कामगार चळवळ नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यातून २५ आॅक्टोबरला राज्यपालांनी आदेशही काढला आहे. हा आदेश कामगारांवर अन्याय करणारा ठरणार आहे. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे राज्यभरात कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वात बाजार बंदची हाक देण्यात आली होती. या वेळी शासनाच्या विरोधात निदर्शनेही करण्यात आली.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल मापाडी कामगारांनी ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र मोंढा माथाडी कामगार आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी (ता. २७) काम बंद आंदोलन केले. यामुळे हिंगोली बाजार समितीअंतर्गत असलेल्या संत नामदेव हळद मार्केट तसेच भुसार मार्केटमधील शेतीमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद होते.

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. २७) शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होते. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस खरेदी सुरू होती. परंतु भुसार मालाची आवक नसल्यामुळे लिलाव झाले नाहीत असे सूत्रांनी सांगितले. सोलापुरातीलही हमाल-मापाड्यांनी मंगळवारी (ता. २७) एकदिवसीय संप केला. या संपामुळे भुसारमालासह कांद्याचे लिलाव रखडले होते.

राज्य सरकार माथाडी कामगारविरोधी धोरण राबवीत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी नगर कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्हाभरातील बाजार समित्यांमधील हमालांनी बंद पाळला. यामुळे बाजार समितीत सौदे बंद होते. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागण्या सरकारकडे पोहोच करण्याची विनंती प्रशासनाला केली आहे, असे हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी सांगितले.

पुण्यात आज बैठक पुणे बाजार समिती आज (बुधवारी) सुरू राहणार असून, बंदबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी बुधवारी सकाळी ११ वाजता अडते असाेसिएशनची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती असाेसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.

वाशी बाजार समिती बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय पणन सुधारणांच्या विधेयकाला मंजुरी मिळाल्याच्या निषेधार्थ मुंबई (वाशी) बाजार समिती बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय अडते आणि फळ व्यापारी संघटनेने घेतल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संजय पानसरे यांनी दिली. पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी पणन सुधारणेबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले हाेते. मात्र, मंत्र्यांनी आमचा विश्वासघात केल्याचे श्री. पानसरे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com