`सेवाकर प्रश्न मिटेपर्यंत सांगलीत व्यापार बंद आंदोलन सुरूच राहणार`

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली   : मुंबईत भाजप कार्यालयातील बैठकीत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी सेवाकरप्रश्‍नी सकारात्मक चर्चा झाली आहे. गोयल हे मंगळवारी (ता. २२) केंद्रीय अर्थमंत्री व सचिव यांना भेटणार आहेत. सेवाकर प्रश्‍न मिटेपर्यंत सांगली मार्केट यार्डातील व्यापार बंद आंदोलन सुरूच राहील, अशी माहिती सांगली चेंबरचे अध्यक्ष शरद शहा, अडत संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिली. 

खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली चेंबरच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची मुंबईत भेट घेतली. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, चेंबरचे अध्यक्ष शरद शहा, उपाध्यक्ष दीपक चौगुले, प्रशांत पाटील, सुशील हडदरे, अडत संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील या वेळी उपस्थित होते. 

सांगली मार्केट यार्डमधील हळद, गूळ, बेदाणा अडत्यांना २०१३-१४ ते २०१६-१७ या कालावधीतील उलाढालीवर केंद्रीय जीएसटीच्या सांगली विभागीय कार्यालयाने बजावलेल्या नोटिसांकडे शिष्टमंडळाने गोयल यांचे लक्ष वेधले. हळद, गूळ व बेदाणा हा शेतीमाल आहे. राज्यात अन्यत्र कोणत्याही मार्केट यार्डमध्ये हळद, गूळ, बेदाणा अडत्यांना सेवाकर नोटिसा बजावलेल्या नाहीत. केवळ सांगलीतच नोटिसा बजावल्या जात आहेत. वसूल न केलेला सेवाकर भरायचा कसा, अशी कैफियत या वेळी व्यापाऱ्यांनी मांडली. 

गोयल यांच्याकडे ‘अर्थ’चा कार्यभार नाही केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचा प्रभारी कार्यभार देण्यात आल्याची माहिती ‘चेंबर’ला समजली होती. त्यावरून त्यांची भेट घेण्याचे ठरले होते. मात्र गोयल यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचा प्रभारी कार्यभार नसल्याचे शुक्रवारी समजले. दरम्यान, ‘चेंबरची भूमिका अर्थमंत्री व सचिवांना कळवेन. सेवाकरप्रश्‍नी सकारात्मक निर्णय होईल, असे गोयल यांनी सांगितल्याची माहिती शहा यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com