खटावमधील ग्रामस्थांनी खर्डा भाकरी खाऊन साजरी केली 'काळी दिवाळी'

ग्रामस्थांचे आंदोलन
ग्रामस्थांचे आंदोलन

वडूज, जि. सातारा   : खटावचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, या मागणीसाठी तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी वडूज येथील तहसीलदार कार्यालयासमोर मंगळवारी (ता. ६) खर्डा भाकरी खाऊन काळी दिवाळी साजरी केली. या वेळी तालुकावासियांच्या वतीने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार जयश्री आव्हाड यांना आंदोलकांनी कुसळांची पेटी दिवाळी भेट म्हणून दिली.

येथील अभेद सामाजिक संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शहाजीराजे मित्र मंडळ, खटाव तालुका सोशल फाउंडेशन आदी संस्थांच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, रणजितसिंह देशमुख, अनिल देसाई, नंदकुमार मोरे, संदीप मांडवे, सी. एम. पाटील, प्रा. बंडा गोडसे, विजय शिंदे, शहाजीराजे गोडसे, नाना पुजारी, अनिल पवार, तानाजी देशमुख, डॉ. महेश गुरव, अंकुश दबडे, नगराध्यक्ष विपूल गोडसे, सचिन माळी, संदीप गोडसे, दिलीप डोईफोडे, महंमद शरीफ आत्तार उपस्थित होते.

येथील हुतात्मा स्मारकापासून मोर्चाला सुरवात झाली. डोक्यावर भाकऱ्यांची चवड बांधलेली गाठोडी व प्रशासनाला दिवाळीची भेट देण्यासाठी आणलेली कुसळांची पेटी घेऊन हा मोर्चा तहसीलदार कार्यालयात आला. त्याठिकाणी मान्यवर तसेच आंदोलक कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त केली. ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तर जनावरांनाही चारा पाण्याच्या शोधात फिरावे लागत आहे. अशी स्थिती असताना प्रशासनाला तालुक्यात कोठे हिरवळ दिसली आणि तालुक्याला दुष्काळ यादीतून वगळले गेले? असा उद्विग्न सवालही या वेळी करण्यात आला. तालुक्यात टंचाईची समस्या कायम राहिली तर आगामी काही दिवसांतच तालुक्यात मोठे जलसंकट निर्माण होणार आहे. त्यामुळे शासनाने खटावचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा अन्यथा हे आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. दरम्यान सोमवारी (ता. ५) खासदार उदयनराजे भोसले यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com