औरंगाबाद येथे दुष्काळग्रस्तांचा मागण्यांसाठी मोर्चा

औरंगाबाद येथे मोर्चा
औरंगाबाद येथे मोर्चा

औरंगाबाद  : विविध प्रश्नांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणसह नगर जिल्ह्यातील शेवगाव व बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्‍यातील दुष्काळी भागातील नागरिकांनी सोमवारी (ता.६) औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ‘हाताला काम द्या, दुष्काळी मदत द्या, खाण्याकरिता धान्य द्या’ आदी घोषणांचे फलक, महिलांनी डोक्‍यावर पाण्याचा हंडा घेऊन मोर्चात सहभाग नोंदवत आपला आक्रोश व्यक्‍त केला.

अन्नदाता शेतकरी संघटनेच्या पुढाकारातून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दुष्काळग्रस्तांना शासनाकडून न्याय व आधार मिळावा म्हणून या मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी दिली.

या वेळी मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांविषयी निवेदन सादर केले. यावेळी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी, किशोर दसपूते, पवन आवटे, हनुमान बेळगे, मकबूल पठाण, नंदकुमार गोर्डे, बंडू गवारे, जिजा आवटे, संजय जाधव उपस्थित होते. येत्या रविवारपर्यंत (ता.१२) गोदावरी पात्रात व डाव्या कालव्यात पाणी सोडले नाही, तर जलसमाधी आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

या आहेत प्रमुख मागण्या

  • महिनाभरापासून कोरड्या पडलेल्या गोदावरी नदीपात्रात पाणी सोडावे. 
  • उजव्या कालव्याला विहामांडवापर्यंत पाणी सोडून सीआर गेट बंद करावे. 
  • आपेगाव, हिरडपूरी बंधाऱ्यात पाणी सोडावे.  
  • बालानगर, अडूळ, विहामांडवा, डोणगाव व औरंगाबाद जिल्ह्यात टॅंकरची संख्या वाढवावी. 
  • विमा कंपनीकडून पीक विम्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे ती दूर करावी. 
  • शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून दुष्काळी मदत तातडीने मिळावी. 
  • पावसाळा जवळ आला आहे, त्यामुळे अनेक शेतकरी आपली जनावरे छावणीत ठेवू शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांना दावणीला चारा किंवा आर्थिक मदत द्यावी. 
  • शेतकरी, शेतमजुरांना आपत्कालीन निधीतून धान्य द्यावे. 
  • खरीप पेरणीसाठी सरकारने आर्थिक मदत करावी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com