मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा `उलगुलान मार्च`

अनेक मागण्यांसाठी आम्ही हा मोर्चा काढला आहे. जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. सोमय्या मैदानात आम्हाला परवानगी दिली नाही, तरीही आम्ही रस्त्यावर राहणार, मग पाहू सरकार काय करतंय ते. आम्ही काही तरी पदरात पाडून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. - बी. जी. कोळसे पाटील , माजी न्यायाधीश.
शेतकरी, आदिवासींचा मोर्चा
शेतकरी, आदिवासींचा मोर्चा

मुंबई : दीडपट हमीभाव मिळावा, कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात, दुष्काळग्रस्तांना तातडीची मदत द्यावी, शेतीला दिवसा वीजपुरवठा करावा, यांसह विविध न्याय्य मागण्यांसाठी निघालेल्या शेतकरी आणि आदिवासींच्या उलगुलान मार्चने बुधवारी (ता. २१) मुंबईत प्रवेश केला. आज (गुरुवारी) हा मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे.

या आंदोलनात उत्तर महाराष्ट्रातील हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील, जलतज्ज्ञ राजेंद्रसिंग, कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव, शिवसेनेचे कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदींनी ठाण्यात भेट देऊन आंदोलकांना पाठिंबा दर्शविला आहे.

लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. ठाण्यातील आनंद दिघे प्रवेशद्वार येथील जुना चेकपोस्ट नाका येथून सकाळी १० वाजता या मोर्चाची सुरवात झाली. दिवसभर उन्हातान्हात पायी चालत हे आंदोलक संध्याकाळी मुंबईतील सोमय्या मैदानात पोचले. आंदोलकांचा बुधवारचा मुक्काम याच ठिकाणी होता. त्यानंतर गुरुवारी पहाटे हा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होईल. आझाद मैदानात पोचल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा निश्चित होईल, असे सांगण्यात आले.

मागण्या मान्य झाल्याशिवाय उठायचे नाही, या निर्धाराने आम्ही लढण्याचे ठरवले असल्याचे प्रतिभा शिंदे यांनी या वेळी स्पष्ट केले. लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रमुख नेतृत्वाखाली व श्रमिक एल्गार विदर्भ व लोकशासन आंदोलन, पश्चिम महाराष्ट्र आदी संघटना मोर्चात सहभागी आहेत. संजय महाजन, राजू गायकवाड, जिला वसावे, ज्योती बढेकर, फिरोज मिठीबोरवाला, सचिन धांडे, रवी भिलाणे, शरद कदम, धनंजय शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यात सामाजिक कार्यात अग्रेसर आणि दातृत्वाबद्दल सुपरिचित असलेले शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये राहूनही सरकारविरोधी मोर्चा, आंदोलकांना कोणताही भेदभाव न करता सर्व प्रकारची मदत करण्यात आघाडीवर असतात. वर्षभरापूर्वी निघालेल्या नाशिक ते मुंबई लाँगमार्चच्या वेळीसुद्धा त्यांच्यातील या दातृत्वाचे दर्शन मोर्चेकऱ्यांना पाहायला मिळाले होते. कोणताही गाजावाजा न करता पडद्याआड राहून आंदोलकांना मुक्कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यापासून ते सर्व मूलभूत सुविधा त्यांच्यामार्फत पुरवल्या जातात. मंगळवारी (ता. २०) ठाणे मुक्कामी असलेल्या कष्टकरी, आदिवासी मोर्चेकऱ्यांनाही याचा पुन्हा एकदा सुखद अनुभव आला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे विस्तारक राहुल लोंढे यांनी याकामी मदत केली.

हजारो शेतकऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी विधान भवनावर हा धडक मोर्चा काढला आहे. एक वर्षापूर्वी याच मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई असा हजारोंच्या संख्येने मोर्चा काढला होता. सरकारने आश्वासने दिली, मात्र ती आजही आश्वासनेच राहिली आहेत. म्हणून पुन्हा एकदा हा मोर्चा निघाला आहे. तेव्हा आणि आत्तासुद्धा या मोर्चाला शिवसेनेचा पाठिंबा आहे. शिवसेनेने रस्त्यावर उतरून या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे, असे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.   या आहेत प्रमुख मागण्या

  • उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा व तो मिळण्यासाठी न्यायिक व्यवस्था तयार करण्यात यावी. 
  • पिढ्यानपिढ्या वनजमिनी कसत असलेल्या शेतकऱ्यांना वनाधिकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे त्वरित त्या जमिनीचे मालक बनविण्यात यावे.
  • शहरांप्रमाणे शेतकऱ्यांसाठीही दिवसासुद्धा वीजपुरवठा करण्यात यावा.
  • वनपट्टेधारकांना व ज्यांचे वनदावे प्रलंबित आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत व पीककर्ज मिळावे. 
  • पेसा कायद्यामध्ये शेड्यूल्ड ५ अंतर्गत येणाऱ्या गावांची पुनर्रचना करून वगळण्यात आलेली गावे समाविष्ट करून घेण्यात यावीत.
  • दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना जिरायत जमिनीला हेक्‍टरी ५० हजार व बागायत जमिनीला हेक्टरी एक लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे.
  • २००१ पूर्वी कसत असलेल्या गायरान जमीनधारकांना कायदेशीर पूर्तता करून कसत असलेल्या गायरान जमिनीचे त्यांना मालक बनविण्यात यावे.
  • दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना व स्वाभिमान सबलीकरण योजना याअंतर्गत राज्यात येत्या काळात किती दलित व आदिवासींना जमीन मिळणार आहे, याचा आराखडा सादर करावा.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com