औरंगाबाद येथे पीक विमाप्रश्‍नी शेतकऱ्यांचे आंदोलन

प्रशासनाकडून लेखी आश्वासन स्विकारताना शेतकरी आणि कार्यकर्ते
प्रशासनाकडून लेखी आश्वासन स्विकारताना शेतकरी आणि कार्यकर्ते

औरंगाबाद : पीक विमाप्रश्‍नी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. ६) येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. न्याय मिळत नसल्याचे पाहून आक्रमक झालेल्या दोघांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. विमाप्रश्नी कार्यवाहीसाठी जिल्हा प्रशासनाने आता पंधरा दिवसांची मुदत मागितली आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सीएससी चालकावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा का दाखल केला नाही, शेतकऱ्यांचे परत आलेले प्रीमिअमचे साडेनऊ कोटी गेले कुठे, जिल्ह्यातील एक लाख ६४ हजार शेतकऱ्यांचा विमा मिळणार कधी, मंडळ बदल झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अतिरिक्त रक्कम जमा का केली नाही, सीएससी द्वारे प्रीमियम भरणा केलेल्या शेतकऱ्यांची तसेच विमा मिळालेला शेतकऱ्यांची यादी कुठे गेली, खरीप रब्बी विमा मिळणार कधी, आदी प्रश्नांवर गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी कामगार पक्ष, अन्नदाता शेतकरी संघटना, मनसेचे पदाधिकारी आणि शेतकरी आक्रमक झाले आहेत.

यासाठी देण्यात आलेल्या मुदतीला वैतागून शेतकऱ्यांनी ६ सप्टेंबरला सामूहिकरीत्या विष प्राशन करून आत्महत्या करू, असा इशारा प्रशासनाला दिला होता. त्यानुसार शुक्रवारी (ता. ६)  जिल्हाधिकारी कार्यालय गाठणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रशासनाला दुपारी दोन वाजेपर्यंत आपल्या मागण्यांवर निर्णय घेण्याची मुदत दिली. तोपर्यंतही न्याय मिळत नसल्याचे पाहून शेतकरी कामगार पक्षाचे महेश गुजर, मनसेचे अण्णासाहेब जाधव यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. 

पोलिसांनी तत्परता दाखवून दोघांनाही रोखल्याने पुढील अनर्थ टळला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने शेतकऱ्यांचे प्रतिनिधी महेश गुजर, अण्णासाहेब जाधव व अन्नदाता शेतकरी संघटनेचे जयाजीराव सूर्यवंशी यांना शेतकऱ्यांनी मांडलेल्या विषयासंबंधी १५ दिवसांत कार्यवाही करण्यासाठी मुदत मागितली. शिवाय याविषयी काय कारवाई केली जाईल, याबाबत लेखी आश्वासन दिले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com