कर्जमुक्तीसाठी खडकवाडी येथील शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरूच

धरणे आंदोलन करताना खडकवाडी येथील शेतकरी
धरणे आंदोलन करताना खडकवाडी येथील शेतकरी

परभणी  : संपूर्ण कर्जमुक्तीसाठी खडकवाडी (ता. मानवत) येथील शेतकऱ्यांनी शनिवारपासून (ता. ३१) गावातील हनुमान मंदिरामध्ये सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन कोणताही तोडगा न निघाल्यामुळे रविवारी (ता. ८) नवव्या दिवशीही सुरू होते. सरकारने येत्या तीन दिवसांत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अन्यथा जिल्ह्यातील गावागावांमध्ये धरणे आंदोलने केली जातील, असे परभणी जिल्हा शेतकरी संघटना सुकाणू समितीच्या सूत्रांनी सांगितले.

खडकवाडी (ता. मानवत) गावातील एकूण ४०० कर्जदार शेतकरी खातेदारांपैकी ८ शेतकऱ्यांना कोणतीही रक्कम न भरता कर्जमाफी मिळाली. १५ शेतकऱ्यांना पाच ते २० हजार रुपये रक्कम भरून कर्ज खाते नील केले. उर्वरित ३७७ शेतकऱ्यांपैकी ५० टक्के शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीत आलेली नाहीत. कर्जमाफीच्या ग्रीन लिस्टमध्ये नावे आलेल्या शेतकऱ्यांना ५० हजारांवरील रकमेचा भरणा करण्याचे सांगितले जात आहे.

सततच्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने रक्कम भरू शकत नाहीत, त्यामुळे संपूर्ण कर्जमुक्तीसाठी खडकवाडी येथील शेतकरी, युवक, महिला ग्रामस्थांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. शनिवारी (ता. ७) मानवतचे तहसीलदार, पाथरीचे उपविभागीय अधिकारी यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा केली; परंतु कोणताही तोडगा न निघाल्यामुळे रविवारी आंदोलन सुरू होते. राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची आकडेवारी खोटी आहे.

खडकवाडी येथील उदाहरणावरून हे स्पष्ट होते आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत कोणत्याही अटी, निकष न लावता सरसकट शेतकऱ्यांचे दीड लाख रुपये कर्ज व्याजासह माफ करावे. कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना नवीन कर्जवाटप करावे, अशी मागणी शेतकरी सुकाणू समितीचे विलास बाबर, किशोर ढगे, मुंजाभाऊ कदम, राजेभाऊ काकडे, सुनील कदम, अंकुश जोगदंड आदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com