राहुरी येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा `रास्ता रोको`

दूध दरप्रश्नी आंदोलन
दूध दरप्रश्नी आंदोलन

नगर : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारपासून (ता.१६) पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला गुरुवारी (ता.१९) चौथ्या दिवशीही प्रतिसाद मिळाला. गुरुवारी जिल्हाभरात सुमारे ६० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त दुध संकलन सुरू झाले असल्याचे दुग्ध विकास विभागातर्फे सांगण्यात आले. राहुरी, वडगाव पान (ता. संगमनेर) येथे दूध दरप्रश्‍नी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेवगाव येथे मोफत दूधवाटप करण्यात आले. दुधाला दर देण्यासंदर्भात कल्याणकारी दूध उत्पादक संघातर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे दुधाला दर मिळावा, यासाठी सोमवारपासून (ता. १६) आंदोलन सुरू करण्यात आले असून गुरुवारी आंदोलनाचा चौथा दिवस होता. आंदोलनाला पहिल्या दोन दिवसांत चांगला प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांनीच दूध घातले नसल्यामुळे १०० टक्के दूध संकलन बंद होते. बुधवारी मात्र बऱ्याच ठिकाणी दूध संकलन सुरू झाले. गुरुवारी त्यात आणखी भर पडली. दुग्ध विकास विभागाच्या माहितीनुसार गुरुवारी साठ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त दूध संकलन झाले.

दूध दरावर तोडगा निघत नसल्याने गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्का आंदोलन पुकारले आहे. त्यानुसार राहुरी येथे ‘स्वाभिमानी’सह शिवसेना व अन्य पक्ष संघटनांनी रास्ता रोको आंदोलन केले. ‘स्वाभीमानी’चे जिल्हाध्यक्ष रवी मोरे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांच्यासह पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. वडगाव पान (ता. संगमनेर) येथे संतोष रोहम, दीपक वाळे, भास्कर दिघे, राहुल दिघे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन गाढवाला दूध पाजत आंदोलन केले. या वेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध करत सरकार विरोधी घोषणाही दिल्या.

शेवगाव येथे पंचायत समितीचे सभापती क्षितीज घुले, बाजार समितीचे सभापती संजय कोळगे, काकासाहेब नरवडे, अरुण लांडे, रामनाथ राजपुरे, संजय फडके, ताहेर पटेल, बाळासाहेब विघ्ने, अंबादास कळमकर, रामभाऊ साळवे, हनुमान पातकळ आदींसह कार्यकर्त्यांनी लोकांना मोफत दूधवाटप केले.

कल्याणकारी दूध उत्पादक संघाचे नेते गुलाबराव डेरे यांनी दुधाला दर देण्याची मागणी करत प्रशासनाला निवेदन दिले. जिल्ह्याच्या अन्य भागात मात्र शांतता होती. गुरुवारीही बऱ्याच ठिकाणी दूध संकलन बंद होते. पोलिसांनी बंदोबस्तात दुधाची वाहने रवाना केली. साठ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक दूध संकलन झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com