पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलन

दूध दरप्रश्नी आंदोलन
दूध दरप्रश्नी आंदोलन

पुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदाेलनाचे पडसाद पुणे जिल्ह्यातही उमटले. कडूस (ता. खेड), न्हावरे (ता. शिरूर) येथे शेतकऱ्यांनी दूध आेतून सरकारचा निषेध केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली.

‘स्वाभिमानी’च्या दूध आंदाेलनाला पाठिंबा देण्यासाठी कडूस, रानमळा, दोंदे, गारगोटवाडी, आगरमाथा (ता. खेड) परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आगरमाथा येथे राजगुरूनगर-कडूस रस्त्यावर दूध ओतून दिले. या वेळी शेतकऱ्यांनी दुधाच्या भाववाढीबाबत घोषणा दिल्या.

या वेळी रानमळा येथील गणेश भुजबळ म्हणाले, की दुधाचा व्यवसाय परवडत नाही. पशुधन खाद्याच्या किमती आभाळाला भिडल्या आहेत. दुधाला दर मात्र कमी आहेत. भाव कमी असल्याने दुग्ध व्यवसाय परवडत नाही. सध्या २१ रुपये लिटर भाव मिळत आहेत. दूध व्यवसायातील हिशोब करता अखेरीस लिटरला चार ते पाच रुपये अंगावर येत आहेत. त्यामुळे शासनाने दुधाला भाववाढ द्यावी. या वेळी गणेश मंडलिक, पांडुरंग चिपाडे, अमित जाधव, रोहित मंडलिक, गणेश भुजबळ, नीलेश जाधव, गणेश चिपाडे यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

न्हावरे (ता. शिरूर) येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रस्यावर दूध अोतून आंदोलन करीत ‘स्वाभिमानी’च्या दूध आंदोलनाला पाठिंबा दिला. नागरगाव, आंधळगाव,कुरूळी, कोळगाव डोळस येथील शेतकऱ्यांनी आंधळगाव येथे शिरूर-चौफुला रस्ता अडवून शासनाचा निषेध केला. सरकारने दुधाचे बाजारभाव वाढल्याशिवाय आंदोलन मागे घ्यायचे नाही असा निर्धार त्यांनी केला. या वेळी आबासाहेब साठे, रणजीत शितोळे, गोरख पवार, अभिजीत रणदिवे आदी शेतकरी उपस्थित होते.

सांगवी (ता. बारामती) येथे दूध दरप्रश्नी आंदोलनास शेतकऱ्यांनी व दुध संकलन करणाऱ्या व्यावसायिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या व दुग्ध व्यावसायिकांच्या मागणीप्रमाणे दुधाला दरवाढ द्यावी, अन्यथा दूध दरप्रश्नी सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बारामती तालुका युवक अध्यक्ष महेंद्र तावरे यांनी दिला आहे. दरम्यान माळेगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण पाटील यांनी माेफत दूध वाटून सरकारचा निषेध केला.

दूध दरप्रश्नी सुरू असलेल्या आंदाेलनाला खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा देत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकारच्या विराेधात निदर्शने केली. या वेळी बाेलताना खासदार सुळे म्हणाल्या, की शेतकरी पोटतिडकीने मागण्या मांडत असताना या सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. आता दुधासाठी हक्काचा दर तो मागतोय. मुख्यमंत्री तुम्ही जागे व्हायलाच हवे. दूध दरप्रश्नी आंदोलनास आमचा सक्रीय पाठिंबा आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com