पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनाचे दुसऱ्या दिवशीही पडसाद

दूध दरप्रश्नी आंदोलन
दूध दरप्रश्नी आंदोलन

पुणे  ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू असेलल्या दूध दरप्रश्नी आंदाेलनाचे मंगळवारी (ता. १७) दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात पडसाद उमटले. विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी दूध आेतून, मोफत दूध वाटप करून तर आंघाेळी करून सरकारचा निषेध केला.  

डोर्लेवाडी (ता. बारामती) आणि परिसरातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी दूध ओतून सरकारचा निषेध केला. काही शेतकऱ्यांनी मोफत दूध वाटून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. सोमवारी (ता. १६) आंदोलनाला सुरवात झाल्यानंतर एकाही शेतकऱ्यांनी येथील दूध संकलन केंद्रावर दूध घातले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आवाहन करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी येथील वंचित असणाऱ्या वैदुवस्ती येथे जाऊन शेकडो लिटर दुधाचे मोफत वाटप केले. या वेळी पंचायत समितीचे माजी सभापती अशोक नवले सरपंच बाळासाहेब सलवदे अविनाश काळकुटे, दत्ता नवले, गुलाबराब कालगावकर, संपत कालगावकर, गोट्या भोपळे, राजेंद्र लोणकर आदी उपस्थित होते. शिरूरच्या पूर्व भागात दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू हाेते.

न्हावरे येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एकमेकांना दुधाने आंघाेळी घातल्या. त्याचबरोबर पूर्व भागातील दूध उत्पादकांनी रास्ता राेकाे, माेफत दूध वाटप करून आंदोलन केले. इनामगाव येथील शेतकऱ्यांनी वांगदरी(श्रीगोंद्याकडे) जाणाऱ्या रस्त्यावर ठिय्या देत आंदोलन केले. पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेत असल्याबद्दल यांच्या निषेधाचा ठराव घेऊन त्यांना शिरूर तालुक्यात फिरू न देण्याचा इशारा दिला. या वेळी श्रीगोंदा साखऱ कारखान्याचे संचालक श्रीनिवास घाटगे, सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब गांधले, संजय घाडगे, राजाराम मचाले, महेश घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

वडगाव रासाई येथे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता अशोक पवार यांनी त्यांच्या गोठ्यातील सुमारे ३०० लिटर दूध गावातील सर्वसामान्य नागरिकांना वाटले. उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दुधाने अंघोळ करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी दूध डेअरीला न घालता पेढे व खवा करणे पसंत केले. काही शेतकऱ्यांनी दूध डेअरीला घातले.

सरकारने दुधाला दरवाढ देणे आवश्यक आहे. परंतु, ती दिली जात नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली आहे. मात्र, केवळ संघटना काम करत आहे म्हणून स्वस्थ बसून चालणार नाही. दुधाला दरवाढ मिळाल्यास सर्वच दूध उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. आजही काहीजण प्रकल्पांना दूध घालत आहेत.

संघटना आंदोलन करणार आहे हे जाहीर केल्यावर लगेच सरकारला पावले उचलावी लागली व ३ रुपयांची दरवाढ जाहीर करण्यात आली. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे असून दूध घालणे बंद करावे. अशा पद्धतीने नाक दाबल्याशिवाय सरकारचे तोंड उघडणार नाही, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com