अभिनव पद्धतीने सणसरला आंदोलन

सणसर आंदोलन
सणसर आंदोलन

भवानीनगर, जि. पुणे   ः सणसर येथील कुरवली चौकात गुरुवारी (ता.१९)  बिरबलाच्या गोष्टीतल्या खिचडीसारखेच खूप उंच मडक्यात ठेवलेल्या दुधाला साय आणायची कृती सुरू होती. मात्र, खूप वेळ जळण जाळूनदेखील दूध अखेर शिजलेच नाही, त्यामुळे सरकारी धोरणाचा निषेध करीत हजारो लिटर दूध आंदोलकांनी रस्त्यावर ओतून दिले.

सणसर येथे रघुनाथदादा पाटीलप्रणीत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते व शिवसेनेच्या युवासेनेचे तालुकाध्यक्ष सोमनाथ गुप्ते यांच्या नेतृत्वाखाली दूध दरप्रश्नी अभिनव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची चर्चा तालुक्यात चांगलीच रंगली. येथील कुरवली चौकात गुरुवारी सकाळी तीन बांबू बांधून त्याला दुधाने भरलेले मडके बांधण्यात आले. जवळपास दहा ते चौदा फूट उंचावर बांधलेल्या या मडक्यातले दूध सरकारी अध्यादेशांच्या प्रती पेटवून, त्याचा जाळ करून तापवायचे होते. मात्र, या दोन्हीमध्ये खूप मोठे अंतर असल्याने अपेक्षेप्रमाणे दूध काही तापले नाही, परिणामी संतापलेल्या दूध उत्पादक व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर हजारो लिटर दूध ओतून दिले.

या आंदोलनात शेतकरी संघटनेचे विद्यार्थी आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नवनाथ बनसोडे, हनुमंत वीर, संजय सोनवणे, राजेंद्र जामदार, विष्णुपंत कदम,  शिवसेनेचे राहुल जगताप, विजय गायकवाड, अजय सोनवणे, राष्ट्रवादीचे पार्थ निंबाळकर, काँग्रेसचे आबासाहेब निंबाळकर आदी सहभागी होते.

‘सरकार आणि विरोधक हे मावसभाऊ’ या वेळी पांडुरंग रायते म्हणाले, की २०१७ मध्ये शासनाने २७ रुपये प्रतिलिटर दूध दराची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात भाव मिळतच नाही, तरीही सरकार कारवाई करीत नाही. सरकारने केलेल्या या दुर्लक्षामुळे राज्यात रोज शेतकऱ्यांची १८ कोटींची लूट होते. आदेश काढल्यापासून आजपर्यंत ७ हजार २०० कोटींची लूट झालेली आहे. याबाबत अजूनही सरकार दुर्लक्षच करीत आहे. सरकार आणि सत्तेतले विरोधक हे मावसभाऊच आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com