सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा प्रतिसाद

दूध दरप्रश्नी आंदोलन
दूध दरप्रश्नी आंदोलन

सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला पाच रुपये दरवाढ किंवा अनुदान मिळावे, या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारपासून (ता. १६) प्रारंभ केलेल्या दूध आंदोलनास जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.

सोमवारी जिल्ह्यात अवघे एक लाख ४९ हजार लिटर दूध संकलन झाले आहे. कऱ्हाड येथील कृष्णाबाई मंदिरासमोर आणि ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस दुग्धाभिषेक करुन दूध दर आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. दहिवडी येथे सातारा-पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको करीत रस्त्यावर दूध ओतण्यात आले. तसेच दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

शेतकऱ्यांना दूध दरवाढ मिळालीच पाहिजे, दुध आमच्या हक्काचे... नाही कुणाच्या बापाचे, शेतकऱ्यांना घामाचे दाम मिळालेच पाहिजे, पाकिस्तानातून साखर आयात करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा अनेक घोषणा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, अनिल घराळ आणि पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या धोरणांचा निषेध केला. कऱ्हाड येथील कृष्णाबाई मंदिरासमोर आणि ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी दुग्धाभिषेक घालून आंदोलनास प्रारंभ करण्यात आला.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस उपाधिक्षक नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शाखाली वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी दूध आंदोलनासाठी आणलेले दूध राहिल्याने ते ओतुन वाया न घालवता त्याचे वाटप झोपडपट्टी परिसर आणि येथील बाल सुधारगृहात करण्यात आले.

दहिवडी येथे शेतकऱ्यांनी सातारा - पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको करीत दूध ओतून दिले. धामणी (ता. माण) येथे संतप्त शेतकऱ्यांनी हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतून देत मंत्री महादेव जानकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. या आंदोलनादरम्यान सातारा-पंढरपूर रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यामुळे पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंड्यादेखील विस्कळित झाल्या होत्या.

जिल्ह्यात दोन्ही वेळचे मिळून २३ लाख ५८ हजार ४०० लिटर दूध संकलित होते. यामध्ये सकाळी १५ लाख ४९ हजार ८०० लिटर दूध संकलन होते. या आंदोलनामुळे सकाळी होणाऱ्या दूध संकलनापैकी अवघे एक लाख ४९ हजार ८०० लिटर म्हणजेच ११.७५ टक्के दूध संकलन झाले आहे. संकलनाच्या आकडेवारीवरून जिल्ह्यातील बहुतांशी दूध संकलन केंद्रे तसेच शेतकरी आंदोलनात सहभागी झाले असल्याचे दिसून येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com