नीरा कालव्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या

नीरा कालव्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या
नीरा कालव्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या

वालचंदनगर, जि. पुणे   ः नीरा डावा कालव्याच्या ४६ क्रमांकाच्या वितरिकेला पाणी सोडण्यासाठी रणगाव, कळंब परिसरातील शेतकऱ्यांनी मंगळवारी जंक्‍शन (ता. इंदापूर) येथे कालव्यावर ठिय्या मांडला. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी येत्या शुक्रवारी (ता. १०) सकाळी पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

नीरा डावा कालव्यावरील उन्हाळी हंगामातील आवर्तनाचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. शेतकरी आक्रमक होत असून पाण्यासाठी शेतकऱ्यांना दररोज आंदोलने करावी लागत आहे. वालचंदनगर, रणगाव, कळंब परिसरातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांची २९ एप्रिल रोजी भेट घेऊन पाणी सोडण्याची विनंती केली होती. पाटबंधारे विभागाने ५ मे रोजी पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिले होते.

मात्र, पाणी न सोडल्याने मंगळवारी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गायकवाड, ॲड. पांडुरंग गायकवाड, हर्षवर्धन गायकवाड, बबलू पवार, प्रकाश साळुंके, रणजित पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी सकाळी कालव्यावर ठिय्या मांडला. अंथुर्णे शाखेचे पाटबंधारे विभागाचे अधिकारी श्‍यामराव भोसले यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन १० मे रोजी सकाळी ४६ क्रमांकाच्या वितरिकेला पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

‘कालवा फुटीमुळे विलंब’ पाटबंधारे विभागाचे अंथुर्ण्याचे शाखाधिकारी श्‍यामराव भोसले यांनी सांगितले, की नीरा डावा कालव्याच्या ४६ क्रमांकाच्या वितरिकेवरील शेतकऱ्यांना ५ मे रोजी पाणी देण्यात येणार होते. मात्र ३ मे रोजी बारामती तालुक्‍यात कालवा फुटला. कालवा दुरुस्तीनंतर सोमवार (ता. ६) रात्रीपासून आवर्तन सुरळीत सुरू झाले. या वितरिकेवरील शेतकऱ्यांना येत्या शुक्रवारी सकाळी पाणी दिले जाणार असल्याचे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com