कडेगाव येथील शेतकऱ्यांचे पाणीप्रश्नी उपोषण सुरु

पाणीप्रश्नी शेतकऱ्यांचे आंदोलन
पाणीप्रश्नी शेतकऱ्यांचे आंदोलन

कडेगाव, जि. सांगली  : टेंभू योजनेचे पाणी खंबाळे औंध येथून मुख्य कालव्यातून बंदिस्त पाइपलाइनद्वारे कडेगाव लघू पाटबंधारे तलावात सोडावे. तसेच तालुक्यातील दुष्काळ व पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन टेंभूच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे आदी मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर येथील सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता.३०) सायंकाळपासून बेमुदत उपोषण सुरू केले.

कडेगाव तलावात टेंभू योजनेचे पाणी नियमित येत नाही. या तलावातून कडेगाव, कडेपूर, नेर्ली, अपशिंगे, कोतवडे आदी गावांच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. तसेच शेतीलादेखील याच तलावातून पाणी मिळते. सध्या या तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याअभावी ऊस पिके व इतर पिके वाळू लागली आहेत. टेंभूचे पाणी सांगोल्यापर्यंत गेले आहे. परंतु टेंभूचा तिसरा टप्पा शिवाजीनगर तलावाजवळ काही अंतरावर असलेला कडेगाव तलाव लाभ क्षेत्रात नसल्याचे कारण पुढे करून या तलावात पूर्ण क्षमतेने पाणी सोडले जात नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले आहेत. हा तलाव लाभक्षेत्रात घ्यावा आणि तत्काळ या तलावात पूर्ण क्षमतेने पाणी सोडून संपूर्ण तलाव पाण्याने भरून घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

यापूर्वी कडेगाव परिसरातील शेतकरी व नागरिकांनी पाणी प्रश्नाबाबत लेखी निवेदन देऊन आंदोलने केली होती. या दरम्यान टेंभू प्रशासनाने मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु त्यांनी दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण केलेले नाही. अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे मंगळवारी (ता. २८) बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. तरीही प्रशासनाने दखल न घेतल्याने तहसील कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख, राजाराम माळी, वैभव देसाई, शांताराम दीक्षित, अनिल देसाई, दत्तात्रेय भोसले यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असे उपोषणकर्त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांकडून उपोषण बेदखल कडेगाव तहसीलसमोर टेंभू पाणीप्रश्नी कडक उन्हाळ्याच्या झळा सोसत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषणाकडे अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. याबद्दल येथील शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com