मराठा समाजाचा आरक्षणासाठी एल्गार

नगर-औरंगाबाद महामार्गावरील कायगाव टोका येथील पुलावर मंगळवारी (ता.२४) अग्निशामक दलाच्या गाडीला आंदोलकांनी आग लावली.
नगर-औरंगाबाद महामार्गावरील कायगाव टोका येथील पुलावर मंगळवारी (ता.२४) अग्निशामक दलाच्या गाडीला आंदोलकांनी आग लावली.

पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला अनेक जिल्ह्यांमध्ये हिंसक वळण लागले. आरक्षण देण्याबाबत सरकारकडून फसवणूक होत असल्याची भावना झालेले हजारो तरुण रस्त्यावर उतरले. जाळपोळ, दगडफेक, लाठीमार, बसेस बंद पडल्यामुळे पंढरपूरला अडकून पडलेले लाखो वारकरी, ठप्प झालेले महामार्ग व जिल्हामार्ग अशा विविध घटनांमुळे राज्यावर दिवसभर मराठा आरक्षण आंदोलनाची अस्वस्थ छाया पसरलेली होती.  बंद शांततेत पार पाडावा, बसेसवर दगडफेक करू नये, असे आवाहन मराठा समन्वय समितीकडून केले गेले होते. तथापि, आंदोलन चालू असताना सरकारकडून कोणत्याही हालचाली झाल्या नव्हत्या. अनेक भागांमध्ये आंदोलकांचा संयम सुटल्यामुळे जाळपोळीच्या घटना घडल्या. ‘‘मराठा आंदोलनाला बदनाम करण्यासाठी काही ‘पेड’ लोक आंदोलनात घुसले आहेत. पुढे निवडणूक असल्यामुळे असे प्रकार वाढणार आहेत. मात्र आंदोलकांनी या ‘पेड’ लोकांना खड्यासारखे बाजूला करावे,’’ असे सांगत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बंद मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र सरकार फसवीत असून, मुख्यमंत्रीच आंदोलनाला बदनाम करीत असल्याचा प्रतिआरोप आंदोलकांनी केला.  संसदेच्या दोन्ही सभागृहांतदेखील मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला. ‘‘मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या असून, आता राजकारण न करता समाजाच्या मागण्या विनाविलंब मान्य केल्या जाव्यात,’’ अशी जोरदार मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी संसदेत केली.  मराठा आरक्षणासाठी औरंगाबादमध्ये सोमवारी आंदोलन सुरू असताना काकासाहेब शिंदे (कायगाव टोक, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) या अठ्ठावीस वर्षीय तरुणाने गोदावरी नदीत स्वतःला झोकून देत जलसमाधी घेतली होती. यामुळे संतप्त झालेल्या सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मंगळवारी राज्यव्यापी बंदची हाक दिली होती. वारकरी व रुग्णवाहिकांना बंदमधून सूट देण्यात आली होती.  काकासाहेब शिंदे यांनी आत्महत्या करूनही सरकार जागे होत नसल्याचे पाहून बुधवारी औरंगाबादमध्ये जयेंद्र सोनवणे (वय २८) (देवगाव रंगारी, ता. कन्नड) या दुसऱ्या तरुणानेदेखील कोरड्या नदीपात्रात उडी घेतली. यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. तसेच जगन्नाथ विश्‍वनाथ सोनवणे (वय ५५ वर्षे) यांनी विषारी द्रव्य घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. श्री. सोनवणे यांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोदावरीत जलसमाधी घेतलेल्या काकासाहेबवर अतिशय तणावपूर्ण वातावरणात अंत्यसस्कार केले गेले. मात्र याचवेळी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे व काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड कायगावमध्ये गेल्यामुळे आंदोलक अजून बिथरले. या वेळी दोघांनी पोलिसांसमोरच धक्काबुक्की केली. खासदार-आमदारांची जमावाच्या तावडीतून कशीबशी सुटका करण्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला.  काकासाहेबच्या मृत्यूमुळे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद-पुणे महामार्गावर सकाळीच ठिय्या दिला. सातारा, सोलापूर, पुणे, मुंबई वगळता राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली. काकासाहेबवर अंत्यसंस्कार होताच आंदोलकांनी अग्निशामक दलाच्या गाडीसह अजून एक वाहन पेटवून दिले. या गोंधळात बंदोबस्ताला असलेल्या श्याम काटगावकर या हवालदाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला. नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक बंद पाडण्यात आली. हिंगोलीत पोलिसांची जीप जाळण्यात आली.  मराठवाड्यात भरपावसात आंदोलनाला धग होती. जालन्याच्या घनसांगवी भागात पोलिस ठाण्यावर हल्ला करून वाहनांची जाळपोळ झाली. परभणीत रेल रोको आंदोलन झाले. लातूर भागात कडकडीत बंद झाल्यामुळे रस्त्यावर एसटी धावली नाही. परभणीत आंदोलकांनी एसटी बसेसवर तुफान दगडफेक केली. दगडफेकीतून पोलिस आणि पत्रकारदेखील सुटले नाहीत. उस्मानाबादमध्ये एसटी डेपोजवळ दगडफेक झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी ठिय्या दिला व टायर जाळून सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली.  मालवाहतूकदारांच्या संपाचा पाचवा दिवस व त्यात पुन्हा मराठा आरक्षण आंदोलनामुळे पुणे-बंगळूर महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग तसेच मुंबर्ई-आग्रा महामार्गावर नेहमीपेक्षा कमी वाहतूक झाली. त्यामुळे विविध बाजार समित्यांमध्ये शेतीमालाची आवक रोडावली. अनेक भागांतील बाजार समित्यांमध्ये लिलाव रद्द करण्यात आले. सोलापूर-औरंगाबाद हायवेदेखील रोखून धरण्यात आला.  आरक्षणाच्या मागणीसाठी बंद काळात आक्रमक झालेल्या तरुणांना आवर घालताना पोलिसांची दमछाक झाली होती. बीडमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलकांनी उग्र निदर्शने केली. काही ठिकाणी दगडफेड झाली. नांदेडला पोलिसांच्या लाठीमारात पाच जण जखमी झाले. जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मुख्यमंत्री, आमदार, खासदारांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा नेण्यात आली.  आज मुंबई बंद दुपारनंतर मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांच्या झालेल्या बैठकीत आज (ता. २५) मुंबई बंदचा निर्णय घेण्यात आला. पालघर, नवी मुंबई, रायगड जिल्हा बंद ठेवण्यात येणार असून, नवी मुंबई बाजार समितीत व्यवहार होणार नाही. आजचा बंद आम्ही यशस्वी करण्यासाठी मुंबईत सायकलदेखील फिरू देणार नाही, असा इशारा क्रांती मोर्चाने दिला आहे. आंदोलनातील घडामोडी

  • मराठा आरक्षण मागणीच्या राज्यव्यापी बंदला अनेक जिल्ह्यांत हिंसक वळण
  •  खासदार, आमदार, पोलिसांवर आंदोलक बरसले
  •  पोलिस ठाण्यावर हल्ला, बसेसची जाळपोळ, लाठीमाराच्या घटना
  •  मराठवाड्यात अजून दोन जणांचा आत्महत्येचा प्रयत्न
  •  सकल मराठा समाज क्रांती मोर्चा आणि राज्य सरकारमध्ये अजूनही चर्चा नाही
  •  पेड लोक आंदोलनाला बदनाम करण्यासाठी आंदोलनात घुसले ः चंद्रकांतदादा पाटील 
  •  सरकार दिशाभूल करते आहे ः क्रांती मोर्चाचा प्रतिआरोप
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com