ऊसतोड कामगारांचा यंदा ‘कोयता बंद’

मजूर, मुकादम, वाहतूकदारांचा विचार केला जात नाही. कमी पैशात काम करावे लागते. त्यामुळे शंभर टक्के मजुरी वाढ मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी संप पुकारला आहे. राज्यभर बैठका घेतल्या जात आहेत. बीडला पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मेळावा घेणार आहोत. - केशवराव आंधळे, माजी आमदार व मार्गदर्शक, गोपीनाथराव मुंडे ऊस तोडणी मजूर, मुकादम व वाहतूकदार संघटना.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः मजुरांना कष्टाच्या तुलनेत मोबदला मिळत नाही. त्यामुळे सध्याच्या मजुरीत १०० टक्के वाढ करावी, यासह अन्य मागण्यांसाठी यंदा ऊसतोडणी कामगार संप करणार आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत ‘कोयता बंद’ असेल. राज्य ऊस तोडणी वाहतूक, मुकादम कामगार युनियन आणि गोपीनाथराव मुंडे ऊस तोडणी मजूर, मुकादम व वाहतूकदार संघटनेसह अन्य संघटनांनी हा संप जाहीर केला आहे.  

राज्यात साधारण बारा ते पंधरा लाख ऊसतोडणी कामगार आहेत. कामगारांच्या मागण्यांसाठी राज्यात पहिला संप शिरूर कासार (जि. बीड) येथील कै. हरिभाऊ खंडू ढाकणे यांनी १९६५ मध्ये केला होता. त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी १९७४, १९७६ व १९७८ ला संप केला. त्यावर्षी मजुरीत ५ रुपयांवरून १४ रुपये २५ पैसे प्रतिटन अशी दरवाढ झाली. त्यानंतर कामगारांच्या संघटना सक्रिय होत १९८६ ला झालेल्या संपात ६२, १९८९ ला झालेल्या संपात ४९, १९९२ ला झालेल्या संपात २२ टक्के मजुरी दरवाढ मिळाली.

मात्र, १९९५ ला तब्बल १९ दिवस कडकडीत संप होऊनही दरवाढ दिली गेली नाही. त्यानंतर १९९९ च्या संपात २५ टक्के दरवाढ, वीस टक्के फरक, २००५ च्या संपात ३५ टक्के, २००९ च्या संपात २५ टक्के दरवाढ, वीस टक्के फरक व २०११ च्या संपात ७० टक्के मजुरी दरवाढ झाली. त्या वेळी डोकी सेंटरसाठी पहिल्या मैलाला १९० रुपये १२ पैसे, तर गाडी सेंटरला २१२ रुपये १८ पैशाचा दर झाला होता. त्यानंतर दोन वेळा संप झाला.

सध्या डोकी सेंटरसाठी पहिल्या मैलाला प्रती टन २२८ रुपये ५४ पैसे, तर गाडी सेंटरला २५४ रुपये, टायर बैलगाडीला एक टन ऊस तोडून एक किलोमीटर वाहतूक केली तर २८० रुपये मिळतात. त्यानंतर प्रत्येक किलोमीटरला अवघे बारा रुपये वाढून मिळतात. त्यामुळे दरवाढीसह अन्य मागण्यासाठी यंदा संप करत असल्याचे राज्य ऊसतोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांनी गुरुवारी (ता. २३) नगरमध्ये तर गोपीनाथराव मुंडे ऊस तोडणी मजूर, मुकादम व वाहतूकदार संघटनेचे नेते व माजी आमदार केशवराव आंधळे यांनी बीड मध्ये दोन दिवसांपूर्वी जाहीर केले आहे. यंदा उसाचे क्षेत्र जास्ती असल्यामुळे कारखानदारांपुढे अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे.

याबाबत गहिनीनाथ थोरे पाटील म्हणाले, की  ऊसतोडणी मजुरांना कष्टाचा मोबदला मिळत नाही. मागण्यांकडेही फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे यंदा संप पुकारला असून मागण्या मान्य होईपर्यत संप सुरू राहील.

अशा आहेत मागण्या

  • मजुरीच्या दरात शंभर टक्के वाढ करावी.
  • ऊसतोडणी मुकादमांचे कमिशन वाढवून ३५ टक्के करावे.
  • कारखान्यांनी ऊसतोड मजूर, मुकादमांस पक्के घरे, शौचालये बांधून द्यावे.
  • पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील ऊसतोडणी कामगार सुरक्षा विमा योजनेची अंमलबजावणी करारात ठरल्याप्रमाणे शासनाने करावी व विमा रकमेत वाढ करावी.
  • मजुरांच्या मुलाकरिता प्रत्येक तालुक्‍यात निवासी शाळा, वसतिगृहाची सोय करावी.
  • मजुरांसाठी उन्नती योजनेची नगरसह राज्यात अंमलबजावणी करावी.
  • सर्व मजुरांच्या कुटुंबाचा दारिद्य्र रेषेत समावेश करावा.
  • मजुरांना साठ वर्षांनंतर पेन्शन योजना लागू करावी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com