एकरकमी एफआरपीसाठी सांगली जिल्ह्यात आंदोलनाची धग कायम

सांगली जिल्ह्यात आंदोलन
सांगली जिल्ह्यात आंदोलन

सांगली  ः एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनाची धग रविवारी (ता. १३) दुसऱ्या दिवशीही कायम होती. सोनहिरा, क्रांती, उदगीर, श्री दत्त इंडिया, मोहनराव शिंदे, महांकाली या साखर कारखान्यांच्या गट कार्यालयांना टाळे ठोकण्यात आले. भिलवडी, अंकलखोप, कवठेएकंद, शिरढोण येथील कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात आले. एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी ‘स्वाभिमानी’ने आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. 

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप सुरळीत सुरू आहे. साखर कारखान्यांच्या उसतोडी नियमित आहेत. गाळप हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी झाला तरीही साखर कारखान्यांनी एफआरपीला बगल दिली आहे. 

पहिल्या टप्प्यात एकरकमी एफआरपी देण्याऐवजी ८० टक्के रक्कम साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येऊ लागली आहे. हाच कित्ता अन्य कारखान्यांकडूनही गिरवला जाण्याची भीती आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कवठेएकंद (ता. तासगाव) येथील दत्त इंडियाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. तासगाव तालुकाध्यक्ष अशोक खाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. जोतिराम जाधव, माणिक शिरोटे, संदीप शिरोटे आदी या वेळी उपस्थित होते. 

क्रांती व सोनहिरा सहकारी साखर कारखाना तसेच उदगिरी व दत्त इंडिया कारखाना या चार कारखान्यांच्या भिलवडी व अंकलखोप येथील कार्यालयांना ‘स्वाभिमानी’च्या वतीने टाळे ठोकण्यात आले. जयकुमार कोले, संदीप चौगुले, दशरथ पाटील, सतीश चौगुले आदी या वेळी उपस्थित होते.  शिरढोण येथेही महांकाली व दत्त इंडियाच्या गट कार्यालयाला जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली टाळे ठोकण्यात आले. संजय बेले, अशोक खाडे, दामाजी डुबल, मुकेश चिंचवाडे, सूरज पाटील, शंकर लंगोटे, विराट पाटील, नीलेश लोंढे, योगेश पाटील, श्रेणीक पाटील, गोमटेश पाटील, हणमंत कांबळे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com