ऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोको

सातारा जिल्ह्यात रास्ता रोको
सातारा जिल्ह्यात रास्ता रोको

सातारा  ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने अद्याप उसाचा दर जाहीर केलेला नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी अधिक २०० रुपये आणि मागील थकबाकीची रक्कम कारखान्यांनी द्यावी या मागणीासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी सातारा, कराड व फलटण या तालुक्‍यांत अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे ऊसगाळप बंद पाडल्याचे स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी सांगितले.

दरम्यान, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील ऊसदराचा प्रश्‍न सोडविला त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्‍न मार्गी लावला जाईल, असे आश्‍वासन जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

शनिवारी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कारखान्यांनी एकरकमी पूर्ण एफआरपी देण्याचा निर्णय घेत ऊसदराबाबत तोडगा काढला. असाच तोडगा जिल्ह्यातील साखर कारखाने काढतील अशी आशा होती, मात्र साखर कारखान्यांनी कोणतीच भूमिका घेतली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी सकाळपासून अनेक ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यास सुरवात केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, धर्मराज जगदाळे यांनी आक्रमक भूमिका घेतली. रविवारी (ता.११) पुणे-बेंगलोर महामार्ग रोखण्यात आला. या आंदोलनात ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुन साळुंखे, सातारा तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ यांनी सहभाग घेतला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यात पोलिस बंदोबस्तात रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. कोरेगाव तालुक्‍यात कुमठे, खटावमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कराड तालुक्‍यात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या तालुक्‍यातील मसूर येथील प्रमुख चौकात ‘स्वाभिमानी’ जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यानंतर सह्याद्री साखर कारखान्यावर जाऊन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊसगाळप बंद पाडल्याचे श्री. नलवडे यांनी सांगितले.

इंदोली येथे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब यादव, विक्रम कदम यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कराड तालुक्‍यात पाचवड फाटा येथे रास्ता रोको करण्यात आले. सातारा तालुक्‍यातील शिवथर येथे ‘स्वाभिमानी’चे नेते रजनीकांत साबळे, भानुदास साबळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. फलटण येथेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्का जाम आंदोलन केले आहे. फलटण येथील पुणे - पंढरपूर व बारामती - सांगली रस्त्यावरील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात चक्का जाम आंदोलन केले गेले. या वेळी संघटनेचे धनंजय महामूलकर, डॉ. रवींद्र घाडगे, नितीन यादव, प्रमोद गाडे, सचिन खानिवलकर, अनिल नाळे आदी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com