वऱ्हाडात दूध दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर

दूध दरप्रश्नी आंदोलन
दूध दरप्रश्नी आंदोलन

अकोला : दूधदरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले अांदोलन गुरुवारी (ता. १९) चौथ्या दिवशीही बुलडाणा, वाशीममध्ये सुरूच होते.  बुलडाणा जिल्ह्यात संघटनेचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी अांदोलकांना मज्जाव करीत प्रतिबंधात्मक कारवाई केली. बुलडाणा जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, अमडापूर, संग्रामपूर, नांदुरा अादी ठिकाणी तर वाशीम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात रास्ता रोको अांदोलन झाले. काही ठिकाणी कार्यकर्ते जनावरांसह रस्त्यावर उतरले होते.   

दूधदरवाढीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक प्रतिसाद मिळत अाहे. गुरुवारी ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते चिखली, अमडापूर येथे रस्त्यावर उतरले. संग्रामपूरमध्ये युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात जनावरांसह रस्त्यावर उतरून चक्का जाम अांदोलन करण्यात अाले.

संग्रामपूर बस स्थानकावर झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी डिक्कर यांच्यासह ३९ आंदोलनकर्त्यांना कलम ६८ नुसार स्थानबद्ध करून तामगाव पोलिस स्टेशनमध्ये काहीवेळ नेले. या आंदोलनात रोशन देशमुख, मोहन पाटील, उज्‍ज्‍वल चोपडे, संतोष तायडे, महम्मद शहा, शेख अस्लम, एकनाथ दुतोंडे, नंदू खानझोडे, अनंता मानकर, विलास तराळे, अजय वानखडे, सुनील अस्वार, आशिष नांदोकार, योगेश मुरुख, योगेश घायल, सागर खानझोडे, अनंता अवचार यांच्यासह इतर सहभागी झाले होते. नांदुरा तालुक्यात चौथ्या दिवशीही आंदोलन झाले.

मदर डेअरीचे दूध घेऊन जाणारे वाहन तालुकाध्यक्ष समाधान भातुरकर यांनी माटोडा येथे अडविले. गाडीतील दूध रस्त्यावर अोतून देत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सरपंच किशोर खराटे, महेंद्र दांडगे, विठ्ठल घाटे, एकनाथ खराटे, कैलास खराटे या वेळी उपस्थित होते. मालेगाव तालुक्यातील जउळका रेल्वे तसेच मालेगाव येथे कारंजा चौकातदेखील अांदोलन करण्यात अाले.    

गेल्या तीन दिवसांत झालेल्या अांदोलनामुळे पोलिसांनी खबरदारी घेत ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांची शोध मोहीम सुरू केली. बरेच कार्यकर्ते भूमिगत झाल्याने पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांवर पाळत ठेवली. नातेवाइकांनाही पोलिस ठाण्यात बसून ठेवण्यात अाल्याचा अारोप ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी केला अाहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com