दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलन

दूध दरप्रश्नी आंदोलन
दूध दरप्रश्नी आंदोलन

अकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदानासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून (ता. १६) पुकारलेले अांदोलन रविवारी मध्यरात्रीच सुरू झाले. वऱ्हाडात बुलडाणा जिल्ह्यात या अांदोलनाचा अधिक जोर दिसून अाला.

मध्यरात्री ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी मोताळा व मलकापूर तालुक्यात दूध घेऊन जाणारे टँकर अडविले. दुपारच्या सुमारास वाशीम जिल्ह्यात मालेगाव येथे नगरच्या एका दूध डेअरीचा ट्रक पेटविण्याचा प्रयत्न झाला. शिवाय ठिकठिकाणी दुग्धाभिषेक, रस्त्यावर अोतून देण्याचे प्रकारही झाले. सोमवारी दुपारपर्यंत कुठेही पोलिस कारवाई झालेली नव्हती. ‘स्वाभिमानी’च्या अांदोलनाला रविवारी मध्यरात्रीनंतर सुरवात झाली. मोताळा तालुक्यातील वाघजाळ फाट्याजवळ जळगाव जिल्ह्यातील खासगी डेअरीचे वाहन फोडण्यात अाले. मलकापुरात महामार्गावर दुधाच्या टँकरमधील हवा सोडून देण्यात अाली.

सोमवारी सकाळी मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे ‘राजहंस’च्या वाहनातील दुधाचे पॅकेट रस्त्यावर फोडण्यात अाले. मेहकर शहरानजिक अौरंगाबाद-नागपूर रोडवर प्रसन्ना डेअरीच्या वाहनाची तोडफोड करण्यात अाली. दरम्यान, सोमवारी दुपारी वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथे ‘स्वाभीमानी’च्या कार्यकर्त्यांनी राजहंस डेअरीचा ट्रक पेटवून दिला.

संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दूध बंद आंदोलनाला पाठिंबा देत रस्त्यावर दूध अोतले. संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी दूध फेकत सरकारचा निषेध केला. या वेळी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

या आंदोलनात रोशन देशमुख, मोहन पाटील, संतोष तायडे, अनंता मानकर, शेख असलम, ज्ञानेश्वर हागे, शिवा झाडोकार, विलास तराळे, सुनिल अस्वार, श्रीकृष्णा भालतिलक, आशिष नांदोकार, सागर खानझोड, धनंजय कोरडे, सुरेश रावणकार, अनंता अवचार यांच्यासह तालुक्यातून शेतकरी व शेतमजूर या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

वऱ्हाडात दूध संकलनात अग्रेसर असलेल्या नांदुरा तालुक्यात तालुकाध्यक्ष समाधान भातूरकर यांच्या पुढाकाराने अांदोलन झाले. दहिगाव, माटोडा, ईसबपूर, खुमगाव, बुर्टी, केदार, नायगाव, शेलगाव मुकूंद, कोलासर, वडगाव डिघी, सावरगाव, हिंगणे गव्हाड, चांदूरबिस्वा, डिघी, वडनेर भोलजी, धानोरा विटाळी, पिंप्री अघाव या १७ गावातील शेतकऱ्यांनी मदर डेअरीसाठी होणाऱ्या संकलन केंद्रावर दूध घालणे बंद केले.

सोमवारी संकलित झालेले दूध शालेय विद्यार्थ्यांना वितरित केले गेले. शिवमंदिरात दुग्धाभिषेक करण्यात अाला. मोताळा तालुक्यातील कोथळी येथील शेतकऱ्यांनी डेअरींना दूध न घालता ते रस्त्यावर फेकले तसेच सरकारने दुधाला दरवाढ देण्याची मागणी केली. पोलिस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील, योगेश मोताळकर, विष्णू पाटील, मोहन पाटील, अमोल पाटील, शुभम पाटील, संतोष घाटे, जनार्दन भुसारी, चेतन पाटील, यासीन शाह, हनिफ शाह यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com