जायकवाडीच्या पाण्यासाठी बुधवारी उपोषण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : परभणी जिल्ह्यात चारा पिके आणि जनावरांसाठी जायकवाडी धरणातून डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा प्रणित जायकवाडी पाणी हक्क संघर्ष समितीतर्फे बुधवारी (ता. ८) औरंगाबाद येथील लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.

किसान सभेचे जिल्हाध्यक्ष विलास बाबर यांनीही माहिती दिली. जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता अधिक गंभीर होत आहे. जिल्ह्यातील बहुतांश जलसाठे तसेच अन्य पाण्याचे स्रोत आटत आहेत. या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांकडे पशुधनाचा सांभाळ करण्यासाठी चारा नाही. चारा पिकांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांकडे पाणी नसल्यामुळे पिके वाळून जात आहेत. पाण्याच्या बाबतीत आणीबाणीची स्थिती असल्यामुळे जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे आकस्मिक पाणी आवर्तन सोडण्यात यावे या मागणीसाठी १० एप्रिल रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. परंतु १५ दिवसांचा कालावधी उलटला तरी अद्याप कालव्यास पाणी सोडण्यात आलेले नाही. शहरांसाठी पाणी आरक्षित ठेवण्यात आलेले आहे. 

या परिस्थित शेतकरी, पशुपालक, ग्रामीण जनतेने पाणी आणायचे कुठून असा प्रश्न शासनाला विचारला जात आहे. जायकवाडी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यातून सर्वांसाठी नियोजन होऊ शकते. २०१६ मध्ये यंदापेक्षा वाईट स्थिती असतानादेखील त्या वेळी मार्च महिन्यात डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले होते. उन्हाळ्यात ६० दलघमी पाणी सोडण्याचे नियोजन जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक दोनच्या कार्यकारी अभियंता कार्यालयातर्फे करण्यात आले होते.

परंतु उन्हाळी पाणी आवर्तन सोडण्यात न आल्यामुळे जिल्ह्यत गंभीर स्थिती उद्भवली आहे. त्यामुळे सध्या जायकवाडी धरणामध्ये एकूण सुमारे ६४५ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. या पाणीसाठ्यातून किमान ६० दलघमी एवढे पाणी सोडण्यात यावे मागणीसाठी बुधवारी (ता. ८) औरंगाबाद येथील लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे श्री. बाबर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com