वीस लाख टन साखरनिर्यातीचे करार

ब्राझीलमध्ये यंदा साखर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यातच देशांतर्गत दर चांगले असल्याने कारखान्यांची भीस्त घरगुती बाजारावरच जास्त आहे. त्यामुळे भारतीय साखरेला मागणी आहे.
Agreement for export of 20 lakh tonnes of sugar
Agreement for export of 20 lakh tonnes of sugar

पुणे : ब्राझीलमध्ये यंदा साखर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यातच देशांतर्गत दर चांगले असल्याने कारखान्यांची भीस्त घरगुती बाजारावरच जास्त आहे. त्यामुळे भारतीय साखरेला मागणी आहे. परिणामी, निर्यात अनुदान नसतानाही चांगल्या दरामुळे २०२१-२२ च्या प्रारंभीच साखर कारखान्यांनी २० लाख टनांपर्यंत निर्यात करार केले आहेत. ही निर्यात डिसेंबरनंतर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जाणकारांनी दिली.

साखरनिर्यात मागील हंगाम २०२०-२१ मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर दर चांगले असल्याने ७३ लाख टन निर्यात झाली. सध्याही साखरनिर्यातीसाठी संधी असल्याने कारखाने चाचपणी करत आहेत. त्यामुळे सुरू झालेल्या २०२१-२२ च्या हंगामातही सुरुवातीलाच २० लाख टन साखरनिर्यातीचे करार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र या साखरेला निर्यात अनुदान देण्याचा निर्णय अद्याप झाला नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. 

जागतिक पातळीवर साखर उत्पादनात अग्रेसर असलेल्या ब्राझीलमध्ये प्रतिकूल वातावरणामुळे जागतिक बाजारात दर तेजीत आहेत. अशा स्थितीत भारतात साखरेचा शिल्लक साठा आहे आणि या हंगामातील गाळप तोंडावर आहे. अशा स्थितीत जागातील अनेक देश भारताकडून साखर खरेदीसाठी तयार आहेत. त्यामुळे कारखान्यांना खरेदीदार शोधण्याची गरज नाही. शिपमेंट खर्च जास्त असल्याने आशियाई देशांत ब्राझीलमधून कमी प्रमाणात साखर येत आहे.

देशांतर्गत दर चांगले मागील विपणन वर्षात देशातून इंडोनेशिया, अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिरात, सोमालिया, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया, यमेन आणि इराक देशांत मोठ्या प्रमाणात निर्यात आली. मात्र जाणकारांच्या मते सध्या देशांतर्गत दर चांगले असल्याने कारखान्यांसाठी आकर्षक ठरत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजार दर स्थिर झाले आहेत. अशा स्थितीत सरकारने निर्यात अनुदान न दिल्यास कारखाने इच्छुक राहणार नाहीत. त्यामुळे साखर निर्यात चालू विपणन वर्षात घटण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. 

...असे झाले निर्यात करार जागतिक बाजारात ऑगस्ट महिन्यापासूनच साखरेच्या दरात तेजी असल्याने साखर कारखान्यांनी त्याचा लाभ घेत निर्यात वाढविली. जागतिक पातळीवर साखरेचे दर सुधारलेले असल्याने अनुदानाशिवायही निर्यात परवडत असल्याने साखर कारखान्यांना निर्यात करार करण्यात यश मिळत आहे. भारतीय साखर कारखान्यांनी ४६० ते ४८० डॉलर प्रतिटन फ्री ऑन बोर्ड दराने कच्च्या साखरेचे निर्यात सौदे केले केले आहेत.

देशांतर्गत बाजारात साखरेचे दर सुधारले आहेत. त्यामुळे कारखान्यांना दिलासा मिळाला. तसेच नव्या हंगामातही २० लाख टन निर्यातीचे करार झालेले आहेत. ही साखर डिसेंबरनंतर निर्यात होणार आहे. यात जास्त करार हे कच्च्या साखरेसाठी झालेले आहेत.  - प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक,  राष्ट्रीय साखर सहकारी साखर कारखाना महासंघ

साखर दराला चांगला सपोर्ट मिळाला आहे त्यामुळे तूर्तास अनुदान देण्याची गरज नाही. आतापर्यंत निर्यातीसाठी झालेले सौदे हे जुन्या आणि नव्या साखरेचे झालेले आहेत. यात नव्या साखरेचे सौदे हे १३ ते १४ लाख टनांपर्यंत झाले आहेत. ब्राझीलमध्ये किती साखर उत्पादन कमी होईल याचा आकडा बाहेर आला तर आणखी दर वाढतील. चांगल्या प्रतीची पांढरी साखर कारखान्यांकडे उपलब्ध नाही. त्यामुळे कारखान्यांनी सुरुवातीच्या टप्प्यात पांढऱ्या साखरेची निर्मिती केल्यास निर्यातीसाठी चांगली मागणी राहू शकते. - अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार

गुरुवारचे (ता. ७) देशातील महत्त्वाच्या बाजार समित्यांतील घाऊक दर (रुपये/प्रतिक्विंटल)
दिल्ली ३८००
मुंबई ३६७२
कोलकाता ३९५०
चेन्नई ३९००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com