agriculture news in marathi agri advisory on grapes | Agrowon

खरडछाटणी दरम्यान रोग, किडीच्या प्रादुर्भावाकडे लक्ष द्या

डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. एस. डी. रामटेके, डॉ. दीपेंद्रसिंह यादव, डॉ. सुजय राहा
गुरुवार, 23 एप्रिल 2020

सध्या वातावरणाचा विचार करता बागेमध्ये कमाल तापमानामध्ये वाढ आणि आर्द्रतेमध्ये घट होताना दिसून येते. सध्याच्या परिस्थितीत बागेत उपलब्ध वाढीच्या अवस्थांमध्ये येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजनांची आजच्या लेखात माहिती घेत आहोत.

सध्या वातावरणाचा विचार करता बागेमध्ये कमाल तापमानामध्ये वाढ आणि आर्द्रतेमध्ये घट होताना दिसून येते. सध्याच्या परिस्थितीत बागेत उपलब्ध वाढीच्या अवस्थांमध्ये येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजनांची आजच्या लेखात माहिती घेत आहोत.

रिकटची बाग

 • या वेळी प्रत्येक बागेत ओलांडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असेल. ओलांडा तयार करतेवेळी दोन महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे.ओलांडा हा ‘स्टॉप ॲण्ड गो’ पद्धतीने वाढवून घ्यावा. ओलांड्याकरिता वळवलेली फूट ९ ते १० पानांची असताना सहा ते सात पानांवर खुडावी. या नंतर निघालेल्या बगलफूटी तीन ते चार पानांवर खुडून शेंड्याकडील फुटीला न खुडता पुढे तारेवर सुतळीने बांधून घ्यावी.
 • ओलांड्यावर निघालेल्या फुटी पुढील काळात मालकाड्या म्हणून संबोधल्या जातील. या काडींची जागा किंवा वेलीच्या आयुष्यात एकाच ठिकाणी स्थिर असेल. पुढील काळात फुटींची विरळणी करण्याच्या दृष्टीने आजच या फुटींमध्ये साधारणतः अडीच ते तीन इंच अंतर असणे आवश्यक आहे. हे अंतर मिळण्याकरिता अन्नद्रव्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. ओलांड्याचा एक टप्पा होईपर्यंत नत्र आणि स्फुरद यांची पुर्तता करणे गरजेचे असेल. यामध्ये विशेष नत्राचा (युरिया, अमोनिअम सल्फेट, १८-४६-०, १२-६१-० व अन्य केवळ नत्र आणि स्फुरद असलेल्या ग्रेड्स) वापर महत्त्वाचा आहे. जमिनीचा प्रकारानुसार या खतांची मात्रा एक ते दीड किलो प्रति एकर पर्यंत द्यावी. या अन्नद्रव्यांची उपलब्धता ही ओलांड्याचा पहिला टप्पा पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवावी.
 • बऱ्याचशा बागेमध्ये खत आणि पाणी व्यवस्थापन सुरळीत असूनसुद्धा फुटींची वाढ होत नसल्याचे दिसून येईल. या जमिनीमध्ये चुनखडीची मात्रा जास्त असल्यामुळे किंवा पाण्यांमध्ये क्षारांचे प्रमाण अधिक असल्याने ही परिस्थिती निर्माण होते. पेऱ्यातील अंतर कमी होणे व पानांचा आकार कमी राहणे, हे मुख्य लक्षणे असतात. यावर प्रमुख उपाययोजना म्हणून जमिनीमध्ये सल्फर ५० ते ६० किलो प्रति एकर या प्रमाणे शेणखतात मिसळून बोदामध्ये मिसळणे गरजेचे असेल. जर रिकट घेतेवेळी सल्फर बोदामध्ये शेणखतातून मिसळणे शक्य झाले नसल्यास सध्याच्या काळात ड्रिपरच्या खाली पाणी पडत असलेल्या ठिकाणी तितकीच मात्रा मातीत मिसळून घेतल्यासही फायदा होईल.

जुनी बाग

 • काही बागेत खरड छाटणी होऊन बराच कालावधी झाला. उदा. सबकेन तयार होत आहेत. ( इंदापूर, सटाणा, बोरी विभाग) तर काही ठिकाणी नुकतीच काही दिवसांपूर्वी फळ काढणी होऊन आता खरड छाटणीची तयारी सुरू असेल. काही ठिकाणी फुटींच्या विरळणीची अवस्थाही आढळून येईल.
 • ज्या बागेत खरड छाटणी सुरू करावयाची आहे, अशा बागेत काडी एक डोळ्यावर ठेवून काढावी. बऱ्याचशा ठिकाणी दोन ते तीन डोळ्यावर काडी छाटलेली दिसून येईल. या काडीवर वरचा डोळा बारीक असल्यामुळे तो लवकर फुटेल, खालील डोळा लवकर फुटणार नाही. जर त्याच ओलांड्यावर बारीक काडी असल्यास त्यावरील डोळा पुन्हा बारीक राहील. असे केल्यास फुटी मागेपुढे फुटतील. म्हणून प्रत्येक काडी एक डोळा राखून छाटणे गरजेचे समजावे.
 • मागील हंगामात ओलांडा छोटा राहिला असल्यास किंवा स्टेम बोअरमुळे ओलांडा खराब झाला असल्यास किंवा सूर्यप्रकाशाच्या अधिक तीव्रतेमुळे ओलांडा डागाळलेला असल्यास या ठिकाणी फुटी निघणे शक्य होत नाही. अशा वेळी खरड छाटणीच्या वेळी ओलांडा वाढवणे गरजेचे असेल. अशा परिस्थितीत ओलांड्याच्या शेवटच्या टोकाकडे उपलब्ध असलेली मागील हंगामातील काडी तारेवर बांधून घ्यावी. या ठिकाणी काही वर्ष जुना असलेला ओलांडा व नुकतीच वळवलेली मागील हंगामातील काडी या दोन प्रकारच्या काड्या दिसून येतील. या परिस्थितीमुळे एकाच वेळी फुटी निघणार नाहीत.
 • एकाच वेळी फुटी निघण्याच्या दृष्टीने जुन्या ओलांड्यावर फक्त हायड्रोजन सायनामाईडचे पेस्टिंग करावे. (२० ते २५ मि.लि. प्रती लिटर पाणी) तर नवीन वळवलेल्या काडीवर पेस्टिंग करणे टाळावे. नवीन काडीची लांबी ४ ते ५ पेऱ्यांपेक्षा जास्त नसावी.

कीड आणि रोग व्यवस्थापन

 • जुन्या बागेमध्ये फळकाढणीपर्यंतच्या अवस्थेत भुरी रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून आला असेल. आता जरी खरड छाटणी झाल्यामुळे वेलीवरील सर्व काड्या निघाल्या तरीही या रोगाचे बिजाणू ओलांडे किंवा खोडाच्या सालीमध्ये तसेच राहिले असण्याची शक्यता आहे. पुढील काळात या रोगाचा प्रसार जास्त होऊ नये, याची खबरदारी म्हणून यावेळी सल्फर (८० डब्ल्यूजी) २ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणे खोड व ओलांडे व्यवस्थितरीत्या धुवून घ्यावेत.
 • खरडछाटणीनंतर डोळे फुगण्याच्या अवस्थेत व वाढत्या तापमानात उडद्या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. याच्या नियंत्रणाकरिता, इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.४ मि.लि. प्रती लिटर पाणी किंवा फिप्रोनील (८० डब्ल्यूजी) ०.०६ ग्रॅम प्रती लिटर पाणी किंवा लॅबडा सायहॅलोथ्रीन (४.९ सीएस) ०.५ मि.लि. प्रती लिटर पाणी यापैकी एक फवारणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी.
 • वरील कीडनाशकांच्या फवारणीने कीड नियंत्रणात न आल्यास, इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) १.५ मि.लि. प्रती लिटर पाण्यात मिसळून प्रती वेल या प्रमाणात ड्रेंचिग करावे.
 • रिकट घेतलेल्या बागेमध्ये व जुन्या बागेतही नवीन फुटी निघतेवेळी थ्रिप्सचा प्रादुर्भाव दिसेल. या किडीच्या नियंत्रणाकरिता इमामेक्टिन बेंझोएट (५ एसजी) ०.२२ ग्रॅम प्रती लिटर पाणी किंवा फिप्रोनील (८० डब्ल्यूजी) ०.०६ ग्रॅम प्रती लिटर किंवा सायॲण्ट्रानिलीप्रोल (१० ओडी) ०.७ मि.लि. प्रती लिटर पाणी यांची फवारणी परिणामकारक असेल. ही फवारणी शक्यतो सायंकाळी घेतल्यास चांगले परिणाम दिसून येतील.
 • लवकर छाटणी झालेल्या जुन्या बागेत वेली पाच ते सहा पानांच्या अवस्थेत असतील, तिथे मिली बगचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. याच्या प्रादुर्भावामुळे ‘शुट मालफॉर्मेशन’ची स्थिती दिसून येईल. म्हणजेच फूट वेडी वाकडी होऊन त्यावरील पाने चुरगाळलेली दिसतील. या किडीच्या नियंत्रणाकरिता इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.४ मि.लि. प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

संपर्क - डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी,जि.पुणे)


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...