सोलापुरात माथाडी कामगारांच्या बंदमुळे कांद्याचे लिलाव बंद

भीमा-कोरेगावच्या घटनेचा आम्हीही निषेधच करतो. आम्ही सर्वजण काळ्या फिती लावून काम करण्याची तयारी दाखवली, पण शेतकऱ्यांची अडवणूक नको, अशी भूमिका घेतली. आता आजचे व्यवहार उद्या पूर्ण होतील, बाजार समितीने त्यासाठीची तयारी केली आहे. - विनोद पाटील, प्रभारी सचिव, सोलापूर बाजार समिती.
संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोर असा ठिय्या मारला
संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोर असा ठिय्या मारला

सोलापूर ः भीमा-कोरेगाव प्रकरणाचा निषेध करण्यासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांनी अचानक बंद पुकारत शेतमालाच्या गाड्या उतरविण्यास नकार दिल्याने मंगळवारी (ता.२) बाजार समितीत तणाव निर्माण झाला. मध्यरात्रीपासूनच हमाल-तोलारांनी काम बंद ठेवण्याची भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांची चांगलीच अडचण झाली. विशेषतः कांद्याच्या गाड्यांवर त्याचा परिणाम झाला.  पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथी विजयस्तंभ अभिवादन दिनाच्या निमित्ताने कोरेगाव भिमा येथे सोमवारी घडलेल्या दोन गटातील चकमकीचे पडसाद मंगळवारी (ता. २) राज्यात विविध ठिकाणी उमटले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव आणि देऊळगाव राजा तालुक्यातील काही ठिकाणी, हिंगोली, मनमाड (जि. नाशिक), धुळे, अमळनेर (जि. जळगाव), जालना आदी भागांत या घटनेचे पडसाद उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नियोजित पुणे दौरा रद्द झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी एसटी वाहतूक विस्कळित झालेली आहे. दरम्यान, हिंदुत्ववादी नेते संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर सणसवाडी दगडफेकप्रकरणी पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. सोलापुरात मध्यरात्रीपासूनच बाजारात फळे व भाजीपाला, कांद्याची आवक सुरू होते. सकाळपर्यंत फळे व भाजीपाल्याची आवक आणि त्याचे व्यवहारही पार पडले. पण पहाटेपासून कांद्याच्या गाड्यांची आवक सुरू झाली, तेव्हा हमालांनी अचानकपणे या घटनेच्या निषेधार्थ माल उतरण्यास नकार दिला. सकाळी आठ वाजेपर्यंत जवळपास २५० ते ३०० गाड्या आवारात येऊन थांबल्या होत्या. हमालांच्या या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मग थेट बाजार समितीच्या कार्यालयाकडे धाव घेतली. तिथे बाजार समितीचे सचिव विनोद पाटील यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. त्यानंतर त्यांनी माथाडी कामगार संघटनांशीही चर्चा केली. पण कोणीच ऐकत नव्हते.  दरम्यान, पोलिसांची कुमूक मागवण्यात आली. सहायक आयुक्त शर्मिष्ठा घार्गे, पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी दाखल झाले. पुन्हा पोलिस आणि कामगार संघटना यांच्यात चर्चेची फेरी झाली, तरीही आंदोलनावर कामगार संघटना ठाम राहिल्याने शेतकरीही संतप्त झाले. त्यांनी बाजार समितीच्या समोर सोलापूर-हैदराबाद महामार्गावर रास्ता रोको केला. त्यानंतर प्रशासनासह व्यापाऱ्यांनीही भीमा-कोरेगावच्या घटनेचा निषेध करण्यासाठी काळ्या फिती लावून काम करण्याची तयारी दर्शवली, शेवटी कामगार संघटना मागे हटल्या, माल उतरण्यास संमती दिली. पण तोपर्यंत बराचसा वेळ गेल्याने कांद्याचे लिलाव मात्र होऊ शकले नाहीत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com