तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तारण योजनेतून ११ कोटींचे कर्जवाटप

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नांदेड  ः  २०१८-१९ या वर्षात शेतीमाल तारण योजनेअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १६ बाजार समित्यांनी १ हजार ४८ शेतकऱ्यांना ११ कोटी ३९ लाख ५ हजार २८९ रुपयांचे कर्जवाटप केले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचा विविध प्रकारचा एकूण १९ कोटी ७ लाख १९ हजार ८३४ रुपयांचा ५४ हजार ९३९ क्विंटल शेतीमाल तारण ठेवला होता, अशी माहिती राज्य कृषी पणन मंडळाच्या सूत्रांनी माहिती दिली.

खुल्या बाजारातील शेतीमालाच्या दरात घसरण होते. त्या वेळी शेतीमालाची विक्री केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होते. या स्थितीत शेतकऱ्यांना तातडीच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी संबंधीत बाजार समितीकडे शेतमाल तारण ठेवून कर्ज घेता येते. बाजारभावात सुधारणा झाल्यानंतर तारण ठेवलेल्या शेतमालाची विक्री केल्यास फायदा होऊ शकतो. त्यादृष्टीने दरवर्षी १ ऑक्टोबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत राज्य कृषी पणन मंडळातर्फे कृषी उत्पन्न बाजार समित्याअंतर्गत शेतमाल तारण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत तारण शेतमालाच्या चालू बाजार भावानुसार होणाऱ्या किंमतीच्या ७५ टक्के रक्कम कर्ज ६ टक्के व्याज दराने १८० दिवस कालावधीसाठी दिले जाते.

शेतमाल तारणकर्ज योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील १९ पैकी ८ कृषी उत्पन्न बाजार समित्या, परभणी जिल्ह्यातील ११ पैकी ५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, हिंगोली जिल्ह्यातील ७ पैकी ३ कृषी उत्पन्न बाजार समित्या सहभागी झाल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील नांदेड, नायगाव, देगलूर, कुंडलवाडी, धर्माबाद, हदगाव, किनवट, माहूर या ८ बाजार समित्यांनी शेतीमाल तारणकर्ज योजनेअंतर्गत ५४० शेतकऱ्यांना एकूण ५ कोटी ७१ लाख २० हजार १६२ रुपये कर्जवाटप केले आहे. त्यासाठी विविध प्रकारचा एकूण ३३ हजार ३६७ क्विंटल शेतमाल तारण ठेवला आहे. तारण शेतमालाची किंमत ११ कोटी ३ लाख २१हजार १८२ रुपये एवढी होते. या योजनेअंतर्गत पणन मंडळाने बाजार समित्यांना २ कोटी ६८ लाख ५० हजार रुपये रकमेची परिपूर्ती करण्यात आली. यंदा धर्माबाद बाजार समितीने ५० शेतकऱ्यांना ५५ लाख रुपयांचे कर्जवाटप केले, अशी माहिती राज्य कृषी पणन मंडळाचे जिल्हा प्रतिनिधी पृथ्वीराज मानके यांनी दिली.

परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी या पाच कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी एकूण ३५४ शेतकऱ्यांना ३ कोटी ४९ लाख ७३ हजार २८४ रुपये शेतमाल तारण कर्जवाटप केले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, हरभरा, हळद मिळून एकूण ४ कोटी ७७ लाख ६८ हजार ५५६ रुपयांचा १३ हजार ८७९ क्विंटल शेतमाल तारण ठेवला आहे. परभणी बाजार समितीतर्फे स्वनिधीतून राबविली जात आहे. त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु, अन्य बाजार समित्यांना पणनमंडळातर्फे १ कोटी ९७ लाख ९३ हजार ३० रुपये एवढ्या रकमेची परिपूर्ती केली. यंदा परभणी बाजार समितीने २८ शेतकऱ्यांना ३३ लाख रुपये शेतमालतारण कर्ज वाटप केले असे पणन मंडळाचे जिल्हा प्रतिनिधी पंकज चाटे यांनी सांगितले.

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, जवळा बाजार या ३ बाजार समित्यांनी एकूण १५४ शेतकऱ्यांना २ कोटी १८ लाख ११ हजार ८४३ रुपयांचे कर्जवाटप केले आहे. त्यासाठी या शेतकऱ्यांचा हळद, सोयाबीन मिळून एकूण ७६९३.६८ क्विंटल शेतमाल तारण ठेवला आहे. तारण ठेवलेल्या शेतमालाची एकूण किंमत ३ कोटी २६ लाख ३० हजार ९६ रुपये होते. या योजनेसाठी पणनमंडळाने बाजार समित्यांना १ कोटी ५५ लाख २८ हजार ९२८ रुपये एवढी परिपूर्ती केली, असे पणन मंडळाचे जिल्हा प्रतिनिधी ए. के. नादरे यांनी सांगितले.

यंदाच्या वर्षीदेखील शेतमाल तारणकर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य पणन मंडळ तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्फे करण्यात आले आहे.

शेतीमाल तारण कर्जवाटपाची जिल्हानिहाय स्थिती (कोटी रुपये)
जिल्हा  बाजार समिती संख्या शेतकरी कर्ज रक्कम
नांदेड   ८   ५४०  ५.७१२०  
परभणी ५  ३५४  ३.४९७३
हिंगोली   १५४ २.१८११

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com