कृषी पदवीच्या परीक्षांचा कृती आराखडा जाहीर; अंतिम सत्रास १५ जूनची मुदत

पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील ८ व्या सत्रातील विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ऑनलाइन व ऑनलाइन पद्धतीने १५ जूनपूर्वी घेण्यात येतील.
कृषी पदवीची अंतिम सत्र परीक्षा १५ जूनपूर्वी; प्रथम, द्वितीय वर्षांसाठी मुल्यमापनावर प्रवेश
कृषी पदवीची अंतिम सत्र परीक्षा १५ जूनपूर्वी; प्रथम, द्वितीय वर्षांसाठी मुल्यमापनावर प्रवेश

अकोला/नाशिक ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या परीक्षा अडचणीत आलेल्या आहेत. यावर तोडगा म्हणून आता परीक्षेच्या नियोजनाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यानुसार पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील ८ व्या सत्रातील विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ऑनलाइन व ऑनलाइन पद्धतीने १५ जूनपूर्वी घेण्यात येतील. तर या परीक्षेचा निकाल १५ जुलैपूर्वी जाहीर केला जाणार आहे. प्रथम, द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांना मुल्यमापनाद्वारे पुढील वर्षांकरिता प्रवेश दिला जाणार आहे. याबाबत शिक्षण संचालक समन्वय समितीने सत्रनिहाय परीक्षेसाठी सविस्तर कृती आराखड्याची शिफारस केली आहे.

भारतातील विविध राज्यांची सद्यःस्थिती पाहता, महाराष्ट्रात सर्वाधिक जिल्हे हे कोरोना बाधित असल्याने रेड झोनमध्ये आहेत. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण राज्यात आहेत. तसेच महाराष्ट्रातील बहुतेक कृषी महाविद्यालयांची वसतिगृहे जिल्हा प्रशासनाने विलगीकरणाकरिता अधिगृहीत केलेली असून ती वसतिगृहे पुन्हा महाविद्यालय प्रशासनाकडे केव्हा हस्तांतरित केले जातील याची कल्पना नाही. अशा परिस्थितीत सामाजिक अंतर राखणे व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची दक्षता घेणे आणि कृषी व संलग्न विषयांतील सम सत्रातील (२, ४, ६ आणि ८) सर्व विद्यार्थ्यांच्या एकाचवेळी परीक्षा घेणे आव्हानात्मक झालेले आहे. त्याअनुषंगाने, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर अबाधित राखण्याच्या दृष्टीने आणि राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील शैक्षणिक गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी शिक्षण समन्वय समितीने सत्रनिहाय परीक्षेकरिता सर्वानुमते कृती आराखडा तयार केला.

जाहीर करण्यात आलेला अभ्यासक्रमनिहाय कृती आराखडा असा:

  •  कृषी पदविका (दोन वर्ष अभ्याक्रम ) :दोन वर्षांच्या कृषी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण अंतर्गत मूल्यमापनाद्वारे द्वितीय वर्षात प्रवेश दिला जाणार आहे. तर द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा लॉकडाऊन उघडल्यानंतर त्या त्या क्षेत्रातील परिस्थितीनुसार जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात घेतल्या जाणार आहेत.  
  •  कृषी तंत्रनिकेतन(तीन वर्ष अभ्यासक्रम) :  कृषी तंत्रनिकेतन तीन वर्षांच्या अभ्यासक्रमातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे १०० टक्के मूल्यमापन अंतर्गत गुणांनुसार करण्यात येणार आहे. तर द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना मागील वर्षाच्या ५० टक्के गुण आणि ५० टक्के अंतर्गत गुणांनुसार तृतीय वर्षात प्रवेश देण्यात येईल. तर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा लॉकडाऊन उघडल्यानंतर ८ ते १५ जून या कालावधीत त्या त्या क्षेत्रातील परिस्थितीनुसार लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.  
  •  पदवी(प्रथम,द्वितीय व तृतीय वर्ष अभ्यासक्रम) :  पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पुढील सत्रात प्रवेश देण्यात येईल. त्याकरिता ५०टक्के गुण चालू सत्राच्या विद्यापीठाने स्वीकृत केलेल्या अंतर्गत मूल्यमापनावर आधारित देण्यात येईल आणि उर्वरित ५० टक्के गुण गुण हे मागील सत्रांच्या घोषित निकालावर(CGPA) आधारित देण्यात येतील.  
  • पदवी अंतिम वर्ष(८ व्या सत्राची परीक्षा) :  पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील ८ व्या सत्रातील विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ऑनलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने १५ जून घेण्यात येतील आणि निकाल १५ जुलै पूर्वी जाहीर करण्यात येईल.  
  • पदव्युत्तर (एम.एस्सीऍग्री व एम.टेक/आचार्य) :  या विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा व संशोधन घटक (शोधनिबंध) हे भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या सल्ल्याने ऑनलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने लॉकडाऊन उघडल्यानंतर पुढील परिस्थिती आणि वेळेनुरूप मूल्यमापन केले जाईल. अंतिम सत्रातील एम.एस्सी व एम.टेक ज्या ज्या विद्यार्थ्यांचे शोधनिबंध सादर करण्याची मुदत ३१ मे होती अशा विद्यार्थ्यांना शोधनिबंध सादर करण्याकरिता ३१ जुलैपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.
  • पुढील सत्रांसाठीचे प्रवेश असे असतील.

  • पदवी अभ्यासक्रमाच्या ३ व ५ व्या सत्राची नोंदणी १ ऑगस्ट २०२० रोजी होईल.
  • पदवी अभ्यासक्रमाच्या ७ व्या सातव्या सत्राची नोंदणी १ जुलै रोजी होईल.
  • पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन वर्षाच्या प्रथम सत्राचे प्रवेश १ सप्टेंबर २०२० पासून सुरू होतील.
  • लॉकडाऊन ची परिस्थिती वाढल्यास निर्णयांमध्ये काही प्रमाणात फेरबदल होऊ शकतील, असे शिक्षण संचालक समन्वय समितीचे अध्यक्ष व महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक यांनी कृती आराखड्यात नमूद केले आहे.
  • कृषिमंत्र्यांनी केला आराखडा जाहीर कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चारही विद्यापीठांमधील कृषी व संलग्न अभ्यासक्रमाच्या परीक्षा खोळंबल्या होत्या. अखेर त्याबाबत ८७ हजार कृषी विद्यार्थ्यांच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे राज्यातील २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील विविध कृषी व संलग्न अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या परीक्षेचा कृती आराखडा राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी मंगळवार (ता.१२) जाहीर केला. विद्यार्थी काय म्हणतात...   कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेने समूह माध्यमातून कृषी परीक्षांच्या विरोधात मोहीम उघडली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदने दिली. तसेच, राहुरी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. अशोक फरांदे यांच्याशी चर्चा केली होती. या मोहिमेला यश मिळाले. आम्ही सरकारच्या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो. - जयदीप ननावरे, अध्यक्ष, कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना

    विद्यार्थ्यांकडे अध्ययनाची साधने नाहीत. अभ्यासक्रम अर्धवट आहेत. वसतिगृहे उपलब्ध नाहीत. अशा स्थितीत लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेणे चुकीचे ठरले असते. - विद्यार्थी उल्केश साळुंखे, कृषी शाखा, तृतीय वर्ष, उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव

    - ग्रामीण भागातील जनजीवन लॉकडाऊनमुळे विस्कळीत झालेले आहे. परीक्षेसाठी बाहेर पडायचे झाल्यास प्रवास करावा लागला असता. त्यामुळे परीक्षांना आमचा ठाम विरोध होता. सरकारने विद्यार्थ्यांना आवाज ऐकला. - श्रीकांत राजपूत, कृषी पदवीधर

    राज्यातील ४५ हजार विद्यार्थ्यांना कृषिमंत्र्यांनी दिलासा दिला आहे. लॉकडाऊनमध्ये फसलेल्या कृषी विद्यार्थ्यांच्या समस्या वेळीच सरकारला कळल्यामुळे परीक्षा रद्द झाल्या आहेत. - प्रवीण आदबे, कार्याध्यक्ष, कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com