कृषी खात्याकडून धाडसत्र; तीन कोटींच्या निविष्ठांना विक्रीबंद आदेश

कृषी खात्याकडून धाडसत्र; तीन कोटींच्या निविष्ठांना विक्रीबंद आदेश
कृषी खात्याकडून धाडसत्र; तीन कोटींच्या निविष्ठांना विक्रीबंद आदेश

पुणे : कृषी खात्याच्या गुण नियंत्रण विभागाने राज्यभर टाकलेल्या धाडींमध्ये तीन कोटी रुपयांची अप्रमाणित कीटकनाशके व खतांना विक्रीबंद आदेश देण्यात आला आहे. या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यास संशयास्पदपणे उशीर केला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  नामांकित कंपन्यांची दर्जेदार कीटकनाशके, खते, बियाणे हाती असली तरच राज्यातील शेतकऱ्यांना उत्पादन चांगले मिळते. मात्र, दर्जेदार मूलद्रव्यांमध्ये भेसळ करून कोणत्याही नावाने गावोगाव दुय्यम दर्जाची कीटकनाशके व खते विकणाऱ्या टोळ्या तयार झालेल्या आहेत. या टोळ्यांना कृषी खात्यातील काही कर्मचारी, विक्रेते आणि काही व्यावसायिकदेखील सामील झालेले आहेत. ३० ते ७० टक्के कमिशन या मालात मिळत असल्यामुळे विक्रेत्यांचे जाळेही तयार झालेले आहे.  “कृषी विभागाने आता अशा दुय्यम दर्जाच्या उत्पादकांना व पुरवठादारांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच या धाडी टाकण्यात आल्या. यात बेळगावमधील एक व्यावसायिक आढळून आला आहे.  कोल्हापूर, नांदेडसह अकोला आणि लातूरलादेखील माल आढळून आलेला आहे. विविध प्रकारची कीटकनाशके आणि विद्राव्य खते या धाडीत आढळली आहेत. त्याची तपासणी कीटकनाशक प्रयोगशाळांमधून केली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  दरम्यान, गुण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी १५ मार्चला केलेल्या राबविलेल्या धाडसत्रानंतर गेली दोन आठवडे या प्रकरणावर फौजदारी गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, असा सवाल काही कृषी उद्योजकांनीच उपस्थित केला आहे. ‘धाडी टाकून ‘स्टॉप सेल’ द्यायचा आणि परस्पर मलिदा लाटून कारवाई टाळायची, असे ‘तंत्र’ निरीक्षकांकडून वापरले जाते. तोच ‘फंडा’ या प्रकरणातदेखील वापरण्याचा प्रयत्न सुरू आहे काय,” अशी शंका उपस्थित केली जात आहे.  गुण नियंत्रण विभागाने केलेली ही धाडसी कारवाई अवैध कामे करणाऱ्या घटकांना इशारा देणारी ठरली आहे. या कारवाईत कोट्यवधी रुपयांची निविष्ठा सामग्री मिळून आली. मात्र, प्रयोगशाळांमध्ये तपासणी सुरू आहे. त्यामुळे अंतिम अहवाल आल्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल. - विजयकुमार इंगळे, गुणनियंत्रण संचालक, कृषी आयुक्तालय अप्रमाणित मालाची विक्री करण्यासाठी आलेल्या मालावर राज्यात कोल्हापूर व नांदेडला धाड टाकण्यात आली. त्यापैकी कोल्हापूरला गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत आढावा घेण्यात आला असून सर्व कागदपत्रे तपासून पुढील आठवड्यापर्यंत नांदेडलादेखील गुन्हा दाखला होईल. हा माल बाळगणाऱ्या व्यक्तीकडे परवाना आहे. त्यामुळे या निविष्ठा अवैध नसून, अप्रमाणित आहेत. - किसनराव मुळे, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, कृषी आयुक्तालय

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com