पोषणमूल्यावर आधारित कृषी प्रकल्पास प्रारंभ
पोषणमूल्यावर आधारित कृषी प्रकल्पास प्रारंभ

पोषणमूल्यावर आधारित कृषी प्रकल्पास प्रारंभ

पुणे : राज्यातील कृषी विज्ञान केंद्रांच्या मदतीने पोषणमूल्यावर आधारित कृषी प्रकल्प राबविण्यास सुरवात झाली आहे. या प्रकल्पासाठी युनिसेफने आर्थिक मदत केली आहे.  युनिसेफच्या माध्यमातून कृषी शिक्षण व परिषदेमार्फत राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पाची सुरवात पुण्यात परिषदेच्या मुख्यालयात झाली. या वेळी एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनचे तज्ज्ञ, तसेच कृषी विद्यापीठांमधील विविध शास्त्रज्ञ उपस्थित होते.  “दोन कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित असलेल्या या प्रकल्पात चारही कृषी विद्यापीठांच्या अखत्यातरीत असलेल्या कृषी विज्ञान केंद्रांमार्फत गावांची निवड केली जाणार आहे. हा प्रकल्प तीन वर्षांचा राहील. युनिसेफचा निधी कृषी परिषदेमार्फत थेट या केंद्रांना दिला जाईल,’’ अशी माहिती प्रकल्पाच्या पहिल्या बैठकीत देण्यात आली.  युनिसेफच्या राज्य सल्लागार डॉ. प्रमिला मेनन म्हणाल्या, की कृषि उत्पादनाचे धोरण पोषणमूल्याशी निगडित केल्याशिवाय भविष्यातील पिढी समृद्ध होणार नाही. गर्भवती महिलेच्या पहिल्या नऊ महिन्यांपासून प्रसूतीनंतर दोन वर्षे म्हणजे एकूण तीन वर्षांतच मुलाचे पोषण होते. तीन वर्षांनंतर मुलाची कितीही काळजी घेतली तरी शरिराची झालेली हानी भरून निघत नाही.  ‘‘राज्याच्या अनेक भागांत शेतकरी महिला व शेतमजूर महिलांमध्ये पोषणमूल्याची भयावह समस्या आहे. त्यामुळे अंगणवाडी, शेतमजूर व शेतकरी महिला अशा घटकांना विचारात घेऊन पोषणमूल्यावर आधारित शेती व्यवस्था तयार करावी,” अशी सूचना डॉ. मेनन यांनी केल्या. “कृषी संशोधन आणि विस्तार ही सर्वांत मोठी समस्या सध्या उभी आहे. ही समस्या हाताळताना कमकुवत पोषण व्यवस्था सुदृढ करण्याचेदेखील आव्हान आहे,” असे आहार शास्त्रज्ञ डॉ. अंजली गणपुले राव स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे, सदस्य सचिव महेंद्र वारभुवन, कुलगुरू डॉ. अशोक ढवण, परिषदेचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, डॉ. एच. पी. शिंदे तसेच इतर सदस्यांनी या वेळी चर्चेत भाग घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com