अकोला कृषी विद्यापीठ देणार गरजू विद्यार्थ्यांना मदत

पीएच.डी मधील सर्वच तसेच एमएस्सी (कृषी) अभ्यासक्रमांच्या गरजू विद्यार्थ्यांना विद्यापीठ निधीतून मदतीचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला कार्यकारी परिषदेने मंजुरी दिली असून पुढील निर्णयाकरीता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. एमसीईएआरकडून मंजुरी मिळताच या निर्णयाच्या अंमलबजावणीसंदर्भात धोरण ठरविण्यात येईल. सध्या विद्यापीठाचे वार्षिक उत्पन्न ३० ते ३५ लाख रुपयांदरम्यान आहे. या निधीतून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जाणार आहे. - डॉ. विलास भाले, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

नागपूर  ः पैशाअभावी शिक्षण पूर्ण करण्यास असमर्थ असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देत त्यांना विद्यापीठ निधीतून मदतीचा हात देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने घेतला आहे. देश आणि राज्यात अशा प्रकारचा निर्णय घेणारे हे पहिलेच विद्यापीठ ठरले असून, कार्यकारी परिषदेनेदेखील या निर्णयावर शिक्‍कामोर्तब केले आहे. 

कृषी शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील असतात. यातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना विविध टप्प्यांवर भराव्या लागणाऱ्या शुल्काकरीता पैशांची सोय करणे शक्‍य होत नाही. त्यामुळे अशा अनेक कुटुंबांची आर्थिक ओढाताण होते. परीक्षा शुल्काचा भरणा करण्यासाठीदेखील पैसे नसल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेपासूनही वंचित राहतात.

ही बाब लक्षात घेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अशा विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेत त्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी ही संकल्पना मांडली. त्यानंतर कृषी विद्यापीठाच्या सोमवारी (ता. ७) झालेल्या कार्यकारी परिषद सदस्यांच्या बैठकीत या निर्णयावर शिक्‍कामोर्तब झाले.

विद्यापीठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक शुल्क, रोप विक्री व इतर निविष्ठा विक्रीतून विद्यापीठाला दरवर्षी सुमारे ३० ते ३५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. या विद्यापीठ निधीतूनच गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाणार आहे. त्याकरीता विद्यार्थ्यांनी बीएस्सी (कृषी) अभ्यासक्रमाचे सर्व विषय क्‍लिअर केलेले असावेत व इतरही काही निकष ठरविण्यात आले आहेत. 

कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडे पाठविला ठराव कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काकरीता मदतीचा ठराव पारीत केला. त्यानंतर आता हा ठराव महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. या परिषदेच्या मंजुरीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com