अवजारे उद्योगाला लॉकडाऊनमधून सूट नाही 

कृषी क्षेत्रातील खते, बियाणे, कीटकनाशके उद्योगाला लॉकडाऊनमधून वगळताना अवजारे उद्योगाला सूट न दिल्याने ऐन खरिपाच्या तोंडी अवजारांची निर्मिती थांबली आहे.
agricultural-implements
agricultural-implements

पुणे: कृषी क्षेत्रातील खते, बियाणे, कीटकनाशके उद्योगाला लॉकडाऊनमधून वगळताना अवजारे उद्योगाला सूट न दिल्याने ऐन खरिपाच्या तोंडी अवजारांची निर्मिती थांबली आहे. उत्पादने बंद ठेवल्याने उद्योगांमुळे कोटयवधीची हानी होत आहे.  ‘‘केंद्र शासनाने लॉकडाऊनची मार्गदर्शक तत्वे जाहीर करताना अवजारे उत्पादन प्रकल्पांचा समावेश केलेला नाही. केवळ कस्टम हायरिंग सेंटर म्हणजेच अवजारे बॅंका सुरू ठेवण्यास मान्यता दिलेली आहे. तसेच, राज्य शासनाने देखील खास बाब म्हणून कृषी अवजारे उत्पादन प्रकल्पांना लॉकडाऊनमधून वगळलेले नाही,’’ अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  लॉकडाऊन कालावधीत शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हार्वेस्टर, रोटाव्हेटर, कापणी यंत्रे, नांगर अशा सुविधा देणारी कस्टम हायरिंग सेवा सुरू ठेवता येणार आहेत. या सेवा सरकारी अथवा खासगी असल्या तरी चालू ठेवता येतील. तथापि, अवजारे उत्पादनाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.  केंद्रीय गृह सचिवांनी २७ मार्चला काढलेल्या आदेशात कृषी विषयक पाच बाबींना लॉकडाऊनमधून सवलत देण्याचा उल्लेख केला आहे. हमीभाव खरेदी योजनेशी संबंधित प्रक्रिया किंवा शेतमाल खरेदी यंत्रणा, बाजार समित्या किंवा राज्य शासनाने त्यांच्या पातळीवर अधिसूचित केलेले बाजार, खतांची दुकाने, शेतीत गुंतलेले शेतकरी व शेती कामगार आदींना लॉकडाऊनमधून वगळले गेल्याचे सचिवांनी स्पष्ट केले आहे.  सचिवांच्या याच पत्रात खते, बियाणे, कीडनाशके यांच्याशी संबंधित निर्मिती व पॅकेजिंगचे प्रकल्प लॉकडाऊनमधून वगळल्याचे म्हटले आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, इनपुट उद्योगाला वगळताना याच ओळीत अवजारे निर्मिती प्रकल्पांचा देखील समावेश हवा होता. कारण इनपुट व्याख्येत कृषी अवजारे देखील एरवी समाविष्ठ केली जातात. मात्र, केंद्राने नियम तयार करताना ही व्याख्या लॉकडाऊनसाठी संकुचित केली आहे.  राज्यातील अवजार निर्मिती उद्योगाने या गोंधळाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ‘‘अवजारे निर्मिती उद्योगाला न वगळण्याची लेखी विनंती आम्ही राज्य शासनाला केली होती. तथापि, कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे राज्यातील आठ हजाराहून जादा कामगार असलेला व ३०० कोटीची उलाढाल असलेला उद्योग सध्या ठप्प झालेला आहे,’’ अशी माहिती एका उद्योजकाने दिली.  एप्रिल व मे या दोन महिन्यात अवजारांची सर्वाधिक विक्री होते. मात्र, लॉकडाऊनमुळे कामगार नाहीत, स्टॉकही पडून आणि ऐन खरिपात मागणी राहील अशा अवजारांचे उत्पादनही बंद अशा तिहेरी संकटात उद्योग सापडले आहेत.  पंजाबमध्ये मान्यता मग महाराष्ट्रात का नाही? लॉकडाऊनमधून अवजारे उद्योगाला सूट देण्याची दक्षता पंजाब सरकारने घेतली. मात्र, महाराष्ट्र सरकारने ऐन खरिपाच्या तोंडी दुर्लक्ष केल्याने राज्यातील छोटे मोठे ४०० अवजारांची निर्मिती प्रकल्प बंद पडले आहेत. या प्रकल्पांमध्ये अगोदरचे साठे देखील विक्रीविना पडून आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com