धुळे ः कृषी यांत्रिकीकरण योजनेतून मिळणार अवजारे

कृषी यांत्रिकीकरण योजनेतून मिळणार अवजारे
कृषी यांत्रिकीकरण योजनेतून मिळणार अवजारे

देऊर,  जि. धुळे  ः शासनाच्या उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत २०१९-२० या वर्षासाठी कृषी विभागातर्फे कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. यातून विविध अवजारे दिली जाणार आहेत. त्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी २० जूनपर्यंत कृषी विभागाकडे अर्ज सादर करायचे आहेत.  शेतीचा वाढता खर्च, मजुरांची कमी उपलब्धता यामुळे यंत्रांद्वारे शेती करणे आता आवश्‍यकच झाले आहे. अनुदानास पात्र यंत्र- अवजारांमध्ये ट्रॅक्‍टर (२० ते ७० एचपी) पॉवर टिलर, कल्टिव्हेटर, पलटी नांगर, रोटाव्हेटर, सबसॉईलर, पॉवर वीडर, मळणी यंत्र, पॉवर ऑपरेटेड स्प्रेयर, मिनी डाळ मिल व राइस मिल, रिपर व पॅकिंग मशिन आदी यंत्रे, अवजारे मिळतील. शेतकऱ्यांनी मंडळातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज जमा करावेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरणाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन मंडल कृषी अधिकारी अमृत पवार यांनी केले.  यात अनुसूचित जाती-जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व महिला लाभार्थ्यांसाठी कमाल अनुदान मर्यादा ५० टक्के आहे. इतर लाभार्थ्यांसाठी कमाल अनुदान मर्यादा ४० टक्के आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी जिल्ह्यास प्राप्त होणाऱ्या निधीच्या लक्ष्यांकाच्या मर्यादेतच लाभार्थींची निवड करण्यात येईल. जे शेतकरी ट्रॅक्‍टरचलित यंत्र, अवजारांसाठी अर्ज करतील त्यांनी अर्जासोबत त्यांच्याकडे किंवा कुटुंबातील अन्य सदस्यांच्या नावे ट्रॅक्‍टर असल्याबाबतचा पुरावा (आरसी बुक) अर्जासोबत जोडणे आवश्‍यक आहे. प्रत्येक अवजारासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात स्वतंत्र अर्ज करणे आवश्‍यक आहे. ज्या शेती अवजारास जास्तीत जास्त अनुदान देय आहे त्या एकाच यंत्र अथवा अवजारास अनुदान दिले जाईल. अर्जाचा विहित नमुना तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लाभार्थी निवड करताना ज्येष्ठता क्रमवारी तालुका हा घटक मानून तालुका स्तरावरच सोडत पद्धतीने निश्‍चित करण्यात येणार आहे. त्यानुसार उपलब्ध निधीच्या अनुषंगाने पूर्वसंमती दिली जाईल. पूर्वसंमती दिल्यानंतर एक महिन्याच्या आत यंत्र अवजार खरेदी करून अनुदानासाठीचा प्रस्ताव सादर करावा लागेल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com