कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम करणारे : बाळासाहेब थोरात

बड्या उद्योगपतींचे गुलाम असणारे पंतप्रधान या कायद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाही उद्योगपतींचे गुलाम बनवू पाहत आहेत, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम करणारे Agricultural laws enslave farmers
कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम करणारे Agricultural laws enslave farmers

नागपूर : केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही आणि संसदेचे नियम पायदळी तुडवून आणलेले कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार आहेत. बड्या उद्योगपतींचे गुलाम असणारे पंतप्रधान या कायद्यांच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांनाही उद्योगपतींचे गुलाम बनवू पाहत आहेत. पण काँग्रेस पक्ष त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.  केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांवर लादलेले तीन काळे कृषी कायदे रद्द करावेत आणि इंधन दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ट्रॅक्टरसह हजारो शेतकऱ्यांनी भव्य रॅली काढून नागपूर राजभवनला घेराव घातला. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शेकडो महिलांनी रस्त्यावर चुली मांडून भाकरी भाजून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध केला. या वेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, मदत, पुनर्वसन आणि बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे आदी उपस्थित होते.    या वेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर चौफेर हल्लाबोल केला. थोरात म्हणाले, ‘‘मोदींनी काळे कायदे आणून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा विडाच उचलला आहे. शेतकरी ५० दिवसांपासून ऊन, पाऊस, वारा, थंडीत आंदोलन करीत आहेत. या कायद्यामुळे साठेबाजी, महागाई वाढणार, या कायद्यामुळे उद्योगपतींना मोठ्या प्रमाणात नफेखोरीची मुभा मिळणार आहे. या तिन्ही कायद्यांमध्ये शेतकऱ्यांच्या फायद्याचे काही नाही. पण केंद्र सरकारला शेतकऱ्यांचे काही देणे घेणे राहिलेले दिसत नाही. उद्योगपतींचे हित डोळ्यासमोर ठेवून कायदे बनवले आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे. राज्यात शेतकऱ्यांची थकीत कर्ज माफ केली. अतिवृष्टी आणि वादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून दहा हजार कोटींचे पॅकेज दिले. आम्ही फक्त बोलत नाही तर शेतकऱ्यांना मदत करतो. इंधन दरवाढ करून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात कच्च्या इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले असतानाही त्याचा भार जनतेवर टाकला नाही. केंद्र सरकार जोपर्यंत काळे कायदे व इंधनदरवाढ मागे घेत नाही तोपर्यंत संघर्ष थांबवणार नाही.’’ यावेळी डॉ. नितीन राऊत, सुनील केदार, विजय वडेट्टीवार यांची भाषणे झाली. माजी आमदार मोहन जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी आभार मानले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com